पोलिसांनीच घातला ९ कोटींचा दरोडा, मुख्य सुत्रधारासह निलंबीत API ची हत्या; कोल्हापूर हादरलं

कोल्हापूरमध्ये एका निलंबित पोलिस अधिकाऱ्याची हत्या झाली आहे. त्यामुळे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. एपीआय सूरज विष्णू चंदनशिवे असे त्या पोलिस अधिकाऱ्याचे नाव होते. ते ४३ वर्षांचे होते.

२०१६ मध्ये झालेल्या ९ कोटींच्या दरोड्याप्रकरणी सूरज विष्णू चंदनशिवे यांना निलंबित करण्यात आले होते. पण आता त्यांचीच हत्या झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. २०१७ मध्ये त्यांना निलंबित करण्यात आले होते, तर दोन महिन्यापूर्वीच त्यांना बडतर्फ करण्यात आले होते.

त्याप्रकरणातील मुख्य आरोपी मैनुद्दीन मुल्ला याला संपवण्यात आले होते. जानेवारी २०२३ मध्ये त्याला संपवण्यात आले होते. त्यानंतर आता सूरज विष्णू चंदनशिवेचा यांना संपवण्यात आले आहे. त्यामुळे पोलिस दलामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

सूरज विष्णू चंदनशिवे बुधवारी रात्री जेवण करुन शतपावली करण्यासाठी बाहेर निघाले होते. पण ते घरी परतलेच नाही. त्यामुळे त्यांच्या पत्नीने त्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे त्या घराबाहेर पडल्या आणि त्यांचा शोध घेऊ लागल्या.

अशात एका उसाच्या शेतात सूरज विष्णू चंदनशिवे हे पडलेले दिसले. त्यानंतर रुग्णवाहिका बोलावून त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते. पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून आता पोलिसही याचा तपास करत आहे.

वारणा दरोडा प्रकरणी सूरज विष्णू चंदनशिवे यांना निलंबित करण्यात आले होते. याप्रकरणी ७ पैकी ६ पोलिसांचे सांगली जिल्हा पोलिस प्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी निलंबन केले होते. चंदनशिवे यांच्यासह शरद कुरळपकर, दीपक पाटील, शंकर पाटील, रवींद्र पाटील आणि कुलदीप कांबळे यांच्यावर ही कारवाई झाली होती.

सांगलीच्या मिरजेमध्ये एका घरावर छापा टाकून त्यांनी रक्कम जप्त केली होती. त्यामध्ये पोलिसांनी साडेनऊ कोटी रुपयांची रक्कम परस्पर हडप केली होती. हे सर्व वर्षभरानंतर उघडकीस आले होते. त्यामुळे त्या ६ पोलिसांवर निलंबणाची कारवाई करण्यात आली होती.

वारणानगर रोकड दरोडाप्रकरणातील मुख्य आरोपी मैनुद्दीन मुल्ला हा शिक्षण संस्थेमध्ये वाहन चालक म्हणून कामाला होता. त्याला इमारतीमध्ये मोठी रक्कम असल्याचे समजले होते. त्यानंतर त्याने ही रक्कम चोरली होती. त्यावेळी सांगली पोलिसांनी इथे छापा टाकला, तेव्हा त्यांनीही मोठी रक्कम हडपली होती. त्यामुळे कोल्हापूर पोलिसांनी सात जणांवर गुन्हा दाखल करत ६ जणांचे निलंबन केले होते. त्यामध्ये सूरज विष्णू चंदनशिवे हे सुद्धा एक होते.