पत्नीची बौद्धिक पातळी कमी, पतीने मागितला घटस्फोट; न्यायालय मागणी मान्य करत म्हणाले…

लग्नानंतर पती-पत्नीमध्ये वाद होत असतात. अनेकदा हा वाद घटस्फोटापर्यंतही जातो. पण आता पुण्यातून घटस्फोटाचे एक विचित्रच प्रकरण समोर आले आहे. पत्नीची बौद्धिक पातळी कमी असल्याने पतीने घटस्फोट घेतला आहे.

तरुणीची बौद्धिक पातळी कमी आहे ती सुज्ञ नाही, असे म्हणत त्याने न्यायालयात घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने सुद्धा हा दावा मान्य करत घटस्फोटाला मान्यता दिली आहे. सध्या हे प्रकरण सर्वत्र चर्चेचा विषय ठरले आहे.

६ जुलै २०२१ मध्ये त्या दोघांचे लग्न झाले होते. पण फक्त दोन वर्षांमध्येच त्यांचा संसार मोडला आहे. लग्न झाल्यानंतर तरुणीला घरातील कोणतीही कामे जमत नव्हती. तिच्या पतीच्या हे लक्षात आले. त्यामुळे त्याने तिची समजूत काढली.

पतीने तिला तिच्या चुका दाखवून दिल्या आणि त्यात सुधारणा करण्यास सांगितले. पण ती तरुणी त्याच त्याच चुका परत परत करत होती. एकेदिवशी तर तिने गॅस सुरुच ठेवला होता. तो गॅस शेजारी राहणाऱ्यांनी येऊन बंद केला. अशा छोट्या छोट्या चुका ती करत होती.

पतीला तिच्यावर शंका आली होती. त्यामुळे त्याने त्या तरुणीची बुद्ध्यांक चाचणी करुन घेतली. त्यामध्ये ती तरुणी सुज्ञ नसल्याचे समोर आले. त्या तरुणीला बऱ्याच गोष्टी कळत नसल्याचे समोर आले. त्यामुळे तिच्यावर उपचार करण्याची आवश्यकता होती.

त्या तरुणाने याबाबत तिच्या आईवडिलांना माहिती दिली. पण मुलीचे उपचार करण्यास तिच्या आईवडिलांनी नकार दिला. त्यामुळे त्या तरुणाने तिच्याशी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. न्यायालयाच्या सुनावणीला ती हजर नसल्यामुळे पतीकडून हा निकाल लागला. पत्नीने पतीला क्रुरपणाची वागणूक दिल्यामुळे त्यांना हा घटस्फोट दिला जात असल्याने न्यायालयाने म्हटले आहे.