२२ महिलांना जाळ्यात अडकवणाऱ्याला मुंबई पोलिसांकडून अटक, गोड बोलून गाडीवर बसवायचा अन्..; चौकशीत धक्कादायक माहिती उघड

गेल्या काही महिन्यांपासून महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या अनेक घटना समोर येत आहे. अशात पोलिसांनी विनयभंग करणाऱ्या एका आरोपीला अटक केली होती. पण त्यानंतर तपास केला असता पोलिसांना धक्का बसला आहे.

त्या आरोपीने आपण २२ महिलांचा विनयभंग केल्याचे कबूल केले आहे. घरी सोडण्याच्या बहाण्याने तो त्यांना आपल्या दुचाकीवर बसवायचा आणि लांब घेऊन जाऊन त्यांचा विनयभंग करायचा, असे त्या आरोपीने कबूल केले आहे.

बाळू खैरे असे त्या आरोपीचे नाव आहे. तो ३९ वर्षांचा आहे. सायन-कोळीवाडा येथे तो राहतो. मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पीडितेला आपण भावाचा, वडीलांचा किंवा पतीचा मित्र आहे असे सांगत त्यांना गोड बोलून गाडीवर बसवायचा आणि त्यानंतर त्यांचा विनयभंग करायचा, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

बाळू खैरे हा पीडितेचा विनयभंग करायचा. त्यानंतर तो त्यांच्याकडे असलेली रक्कम आणि मोबाईल हिसकावून घेऊन पळून जायचा. पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सापळा रचला होता. त्यासाठी पोलिसांचे पथक दोन दिवस दिवा येथे थांबले होते.

अशात जेव्हा पोलिस त्याला पकडायला गेले, तेव्हा त्याने पोलिसांना बघून घेतले. त्यामुळे त्याने खारफुटीत उडी मारली होती. त्यानंतर पोलिसांच्या पथकानेही खारफुटीत उडी मारुन त्याला पकडले. त्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली. तसेच त्याकडे असलेले मोबाईल आणि रक्कम जप्त केली आहे.

या वर्षभरात बाळू खैरे याने तब्बल २२ महिलांचा विनयभंग केला होता. पण फक्त एकाच महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्या महिलेने पोलिसांना सांगितले की, आरोपीने तिला घरी सोडण्यासाठी लिफ्ट दिली. त्यानंतर तिला वांद्रे येथील एका इमारतीत नेऊन तिचा विनयभंग केला. त्यावेळी मी आरडाओरड केली तर त्याने माझा फोन घेऊन तिथून पळ काढला. महिलेच्या या तक्रारीनंतर पोलिसांनी सापळा रचत त्याला ताब्यात घेतले आहे.

बाळू खैरे गोड बोलून महिलांना विश्वासात घ्यायचा. आपण वडिल, भाऊ किंवा पतीचा मित्र असल्याचे सांगायचा. तो त्यांना कामाच्या ठिकाणी किंवा घरी जाण्यासाठी लिफ्ट द्यायचा. त्यानंतर तो त्यांना लांब घेऊन जाऊन त्यांचा विनयभंग करायचा. पोलिसांनी पकडू नये म्हणून तो दिवा येथे राहत होता. त्यावर मुंबईतील वेगवेगळ्या भागातील पोलिस स्टेशनमध्ये सहा गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.