सध्या राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहे. अजित पवार भाजप-शिवसेनेसोबत हातमिळवणी करत सरकारमध्ये सामील झालेले आहे. शरद पवारांसाठी हा मोठा धक्का असतानाच आता उद्धव ठाकरेंनाही एक मोठा धक्का बसला आहे.
विधानपरिषेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश घेतला आहे. आज त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रमही पार पडला आहे. नीलम गोऱ्हे या ठाकरे गटातील महत्वाच्या महिला नेत्या होत्या. त्यामुळे त्यांच्या जाण्याने ठाकरेंना हा मोठा धक्का बसला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. नीलम गोऱ्हे यांचा शिवसेनेतील पक्षप्रवेश हा ऐतिहासिक असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. नीलम गोऱ्हे या अचानक शिंदे गटात कसे गेल्या असा प्रश्न अनेकांना पडत आहे.
आता नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषद घेत पक्षप्रवेशाचे कारण सांगितले आहे. यावेळी त्यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा साधला आहे. सटर-फटर लोकांमुळे नाराज होण्यासारखी पक्षाची स्थिती नाही, असे नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.
गेल्या २५ वर्षांपासून मी एनडीएमसोबत काम करत आहे. शिवसेनेत मला खुप चांगले काम करता आले. निवडणूक आयोगाने आणि सुप्रिम कोर्टाने स्पष्ट निकाल दिला आहे की शिंदेंच्या नेतृत्वात असलेला पक्षच खरी शिवसेना आहे, असे नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.
केंद्रीय स्तरावर एनडीए आहे. भाजपच्या नेतृत्वाखालीच अयोध्येत राममंदिर बांधले जात आहे. तलाक पीडित महिलांना न्याय दिला जात आहे. समान नागरिक कायद्यासारखी सकारात्मक पावली उचलली जात आहे. त्यांच्याकडे समस्यांना तोंड देण्याची इच्छा शक्ती चांगली आहे, असे नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.
तसेच मला बाळासाहेबांनी घेतलेल्या भूमिकांचा सन्मान करुन काम करायचे आहे. हिंदूत्व भूमिकेसोबतच मला महिला विकासाला चालना द्यायची आहे. वंचित घटक, शेतकरी, यांच्या प्रश्नांवर मला काम करायचे आहे, त्यामुळे मी शिवसेनेत प्रवेश केला आहे, असे नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.