गेल्या काही वर्षांपासून ईडी ही संस्था चर्चेचा विषय ठरली आहे. अनेक नेते, व्यवसायिकांच्या घरावर ईडीचे छापे पडत आहे. अशात जळगावमधीन राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ईडीने छापेमारी केली. ४० तासांसाठी ही कारवाई सुरु होती.
जळगावच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे म्हटले जात आहे. ईडीच्या ६० अधिकाऱ्यांनी राजमल लखीचंद ज्वेलर्सच्या शॉपवर छापेमारी केली. तसेच या छापेमारीची स्थानिक पोलिसांनाही माहिती देण्यात आली होती.
दोन दिवस चालल्या या कारवाईमध्ये ईडीने मोठं घबाड जप्त केलं आहे. या छापेमारीनंतर राष्ट्रवादीचे माजी आमदार मनिष जैन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले कारवाई झालेली असली तरी आम्ही हिंमत हरलेलो नाही. तसेच माजी खासदार ईश्वरलाल जैन म्हणाले की, राजकीय दबावातून ही छापेमारी झाली आहे.
ईडीने केलेल्या कारवाईमुळे संपुर्ण जळगावमध्ये खळबळ उडाली होती. त्यावर मनिष जैन काय प्रतिक्रिया देणार याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले होते. अशात त्यांनी तिथे असलेल्या पत्रकारांशी संवाद साधला होता.
ईडीच्या काही काही अधिकाऱ्यांनी आम्हाला सहकार्य केलं आहे. त्यांचे मी आभार मानतो. त्यांनी त्यांची कारवाई पुर्ण केली आहे. यामध्ये कुठला राजकीय दबाव होता का नाही? यावर न बोललेलंच बरं. ईडीने या कारवाईमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे, दागिने जप्त केले आहेत, असे मनिष जैन यांनी म्हटले आहे.
तसेच आम्ही हिंमत काही हरलेलो नाही. आम्ही राजमल लखीचंद जैन आहोत. लोकांनी आमच्यावर खुप विश्वास ठेवला आहे, त्यांचा आमच्यावरचा विश्वास कायम आहे. लोकांच्या आशीर्वादाने आम्ही पुन्हा भरारी घेऊ, असेही मनिष जैन यांनी म्हटले आहे.
तसेच माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. मी अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीचे अध्य़क्ष शरद पवार यांच्यासोबत आहे. आताही त्यांच्याच सोबत राहणार आहे. त्यामुळे झालेली ही कारवाई राजकीय दबावामुळे केलेली होती, असे ईश्वरलाल जैन यांनी म्हटले आहे.
दरम्यान, ईडीने केलेली ही कारवाई जळगाव, मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद अशा चार शहरांमध्ये करण्यात आलेली आहे. तसेच नाशिकमध्येही सहाठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. या छापेमारीत अधिकाऱ्यांना ५० किलो सोने, ८७ लाखांची रोख रक्कम आणि महत्वाची कागदपत्रे सापडली असून ती त्यांनी जप्त केली आहे.