गेल्या काही महिन्यांपासून रस्ते अपघातांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. रस्ते अपघातामुळे अनेकजण गंभीर जखमी होतात, तर काहींना आपला जीवही गमवावा लागत आहे.
गेल्या आठवड्यात शनिवारी असाच एक भीषण अपघात बुलढाण्यात झाला होता. त्यामध्ये २५ जणांना आपला जीव गमवावा लागला होता. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एक धक्कादायक घटना यवतमाळमधून समोर आली आहे.
२५ प्रवासी असलेल्या बसमध्ये ड्रायव्हर दारु पिऊन गाडी चावलत होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली आहे. धर्मेश ट्रॅव्हल्सची ती बस होती. पोलिसांनी त्या ड्रायव्हरच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.
धर्मेश ट्रॅव्हल्सची पुणे-नागपूरची बस ड्रायव्हर भरधाव वेगात चालवत होता. तो बेकायदेशीरपणे बस चालवत होता. त्यामुळे याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी लगेचेच यवतमाळ मार्गावर नाकाबंदी केली होती.
दुपारी ४ वाजेच्या सुमारास पोलिसांनी त्याला अटक केली आहे. बसमध्ये २५ प्रवासी असातानाही ड्रायव्हर वेडीवाकडी बस चालवत होता. त्यामुळे त्यांच्या जीवाला धोका होता. त्यामुळे आता पोलिसांनी ड्रायव्हर प्रल्हाद थेरला ताब्यात घेतलं आहे.
सुरुवातीला पोलिसांनी विचारपूस केली पण ड्रायव्हर उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्यानंतर पोलिसांनी दम दिल्यानंतर आपण दारु प्राशन केल्याची कबूली त्याने दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनीही तपासणी करुन तो बस ड्रायव्हर दारु पिल्याचे स्पष्ट केले.