अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत येत असतात. आता त्यांनी एक असे वक्तव्य केले आहे, ज्यामुळे ते वादात सापडण्याची शक्यता आहे. लोक सरस्वती, शारदा देवीची पुजा करतात, पण त्यांनी किती शाळा काढल्या? असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला आहे.
सामान्यांना शिक्षणाचा अधिकार महात्मा फुले, शाहू महाराजांनी मिळवून दिला आहे. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचा कायदा करुन सगळ्यांसाठीच शिक्षणाची दारे उघडी केली आहे. पण लोक सरस्वती, शारदा देवीची पुजा करतात. त्यांनी किती शाळा काढल्यात आणि किती लोकांना शिक्षण दिलं? असे सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.
तसेच आपला देवांना विरोध नाही. ज्यांना पुजन करायचे आहे, त्यांनी करावे. मी मात्र माझ्याच दैवतांचे पुजन करेन, असेही छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. मराठा समाज विद्या प्रसारक शिक्षण समाज संस्थेच्यावतीने मखमलाबाद येथील एका शाळेतील कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तिथे ते बोलत होते.
दोनशे वर्षांपूर्वी दिड टक्के ब्राम्हणांच्या हातात शिक्षण व्यवस्था होती. त्यावेळी महिलांना देखील शिक्षणास बंदी होती. अन्य सारा समाज अशिक्षित होता. त्यामुळे त्यांचे हक्क, अधिकार कोणालाही माहिती नव्हते. तक्रार जरी केली तरी तक्रार लिहीणारे तेच होते, असे छगन भुजबळांनी म्हटले आहे.
अशात महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनीच बहुजन समाजासाठी शिक्षणाची दारे उघडी केली होती. तसेच शाहू महाराजांनीही पुढाकार घेतला आणि आपले सर्वस्व अर्पण केले. अशा व्यक्तींच्या फोटोंचे पुजन व्हायलाच हवे, असेही छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.