भीषण अपघातानंतर बसला लागली आग; होरपळून २० प्रवाशांचा जागीच मृत्यू, तर ११ जण गंभीर जखमी

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात एक भीषण रस्ता अपघात झाला आहे. प्रांतातील पिंडी भटियान शहरात रविवारी सकाळी एका बसला आग लागली. या बसला लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू झाला आहे, तर ७ जण जखमी झाले आहेत.

अपघात झालेल्या बसमध्ये ४० हून अधिक लोक प्रवास करत होते, असे सांगण्यात येत आहे. जळत्या बसचे फोटोही समोर आले असून, त्यात आगीचे लोळ बाहेर पडताना दिसत आहेत.

जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, पोलिसांनी सांगितले की, ज्या बसला आग लागली ती राजधानी इस्लामाबादहून कराचीला जात होती. बचावकार्यात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की बस पिंडी भटियानजवळ पोहोचली तेव्हा हा अपघात झाला.

येथे पोहोचताच बसने अचानक पेट घेतला. बसमधून उंच ज्वाळा उठत होत्या. आग इतकी भीषण होती की संपूर्ण बस जळून खाक झाली. अपघाताचे कारणही पोलिसांनी दिले आहे. बस आपल्या वेगात जात असताना पिकअप व्हॅनला धडकली, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

या व्हॅनमध्ये मोठ्या प्रमाणात डिझेल भरण्यात आले होते. यामुळेच धडकेनंतर बसला आग लागली. हा अपघात एवढा भीषण होता की त्यात २० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जखमींपैकी बहुतांश प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचे फहाद यांनी सांगितले. अहवालात पुढे म्हटले आहे की, दोन्ही वाहनांचे चालक ठार झाले, तर अपघाताच्या वेळी आसपास उपस्थित असलेल्या लोकांनी खिडक्या तोडून प्रवाशांना बसमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

डॉनच्या वृत्तानुसार, पाकिस्तानातील स्वातंत्र्यदिनानंतर पंजाब प्रांतात अनेक रस्ते अपघात झाले आहेत. 1,659 वाहतूक अपघातांमध्ये 17 जणांचा मृत्यू झाला आणि 1,773 जण जखमी झाले. लाहोरमध्ये सर्वाधिक रस्ते अपघातांची नोंद झाली आहे.

14 ऑगस्ट रोजी, लाहोरमधील प्रमुख सरकारी रुग्णालयांमध्ये रस्ते अपघातात जखमी झालेल्या रुग्णांचा विलक्षण भार दिसला.

आपत्कालीन सेवा विभाग (ESD) द्वारे संकलित केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, 13 ऑगस्ट रोजी संपूर्ण प्रांतात 1,234 रस्ते अपघातांमध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला आणि 1,338 इतर जखमी झाले.