धाराशिवमध्ये एका महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच ती महिला माहेरी आली होती. पण लग्नानंतरची पहिली नागपंचमीच तिची अखेरची नागपंचमी ठरली आहे.
धाराशिव तालुक्यातील वरवंटी येथे ही घटना घडली आहे. रविवारी संध्याकाळी त्या महिलेचा मृत्यू झाला आहे. मृत्यूनंतर तिला लातूरला आणण्यात आले होते, कारण लातूर हे तिचे सासर होते. त्याठिकाणीच तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
सानिका पवार असे संबंधित महिलेचे नाव आहे. काही महिन्यांपूर्वीच तिचा लातूरमध्ये राहणाऱ्या उमेश पवारशी विवाह झाला होता. त्यामुळे लग्नानंतरची सानिकाची पहिलीच नागपंचमी होती. त्यामुळे ती नागपंचमीच्या तीन दिवस आधीच माहेरी आली होती.
वडिलांनी खास नागपंचमीसाठी मुलीला बोलवून घेतले होते. घरातील सर्वजण शनिवारी रात्री घरासमोरील अंगणात झोपले होते. अशात शनिवारी मध्यरात्री सानिकाच्या पायाला साप चावला. तिलाही याची जाणीव झाली.
सानिकाने लगेचच आपल्या वडिलांना आणि भावाला याबाबत सांगितले. त्यानंतर तिला एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचारही सुरु होते. हैराण करणारी गोष्ट म्हणजे सकाळी साडेसहा वाजेपर्यंत ती कुटुंबियांशी गप्पा मारत होती.
अशात सानिकाची प्रकृती अचानक खराब होऊ लागली. त्यानंतर डॉक्टरांनी तिच्यावर उपचारही केले पण त्याचा काहीही फरक पडला नाही. अखेर तिचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे तिच्या दोन्ही कुटुंबांना मोठा धक्का बसला आहे. तसेच परिसरातील नागरिकही हळहळ व्यक्त करताना दिसून येत आहे.