आपला मुलगा मोठा व्हावा, त्याला चांगली नोकरी मिळावी, असे सर्वच आईवडिलांचे स्वप्न असते. अनेक मुलं आपल्या आईवडिलांचे स्वप्न पुर्ण करतात. त्यावेळी आईवडिलांना प्रचंड आनंद होत असतो. असेच काहीसे आता सांगलीमध्ये पाहायला मिळाले आहे.
शिराळा-मुंबई एसटी बसमध्ये कंडक्टरला आपल्या मुलाचा फोन आला होता. त्यावेळी आपली सीआरपीएफमध्ये निवड झाल्याचे त्याने वडिलांना सांगितले. मुलाला नोकरी मिळाल्यामुळे ते खुपच भारावून गेले होते.
कंडक्टर हे ऐकून खुप खुश झाले होते. त्यामुळे त्यांनी खास आपल्यासाठी बेल मारली आणि पेढ्यांचे दोन बॉक्स घेत सर्व प्रवाशांना पेढे वाटले. आपल्या मुलाला नोकरी मिळाल्यामुळे ते प्रचंड खुश झालेले होते. त्यामुळे काही प्रवाशांनी तर त्यांचा व्हिडिओही काढला आहे.
शिराळावरुन एक बस निघाली होती. ती मुंबईला जाणार होती. नंदकुमार ढेबे हे त्या बसचे कंडक्टर होते. मुंबईला जात असताना त्यांना त्यांचा मुलगा शुभमचा फोन आला. त्याने आपली निवड सीआरपीएफमध्ये झाल्याचे सांगितले.
वडील आपल्या कामावर होते. त्यामुळे त्यांनी मुलाशी जास्त संवाद साधला नाही. पण मुलाला नोकरी मिळाल्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यामुळे अखेर कर्तव्यावर असतानाही त्यांनी पहिल्यांदाच स्वत:साठी बसची बेल वाजवली.
तिथे ते एका स्वीटच्या दुकानात गेले. त्यांनी तिथून दोन पेढ्यांचे बॉक्स घेतले आणि ते सर्व पेढे प्रवाशांना वाटून दिले. कंडक्टरच्या चेहऱ्यावरही आनंद पाहून प्रवाशांनीही त्यांना आणि त्यांच्या मुलाला शुभेच्छा दिल्या. तसेच अनेक प्रवाशांनी त्यांचा व्हिडिओही काढला.