अखेर वडिलांच्या मृत्यूवर गश्मीर महाजनीने सोडले मौन; म्हणाला, गेल्या तीन वर्षांपासून त्यांनी…

काही आठवड्यांपूर्वी प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचे निधन झाले होते. ते त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या काही महिन्यांमध्ये एकटेच राहत होते. एका फ्लॅटमध्ये त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या निधनामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली होती.

रवींद्र महाजनी यांच्या मृत्यूमुळे त्यांचा मुलगा गश्मीर महाजनीला टीकेचा सामना करावा लागला होता. गश्मीरने काळजी घेतली नाही. त्यामुळे असे झाले असे म्हणत लोक त्याच्यावर टीका करत होते. पण तो यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळत होता.

अशात सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने एक क्वेश्चन सेशन घेतले होते. त्यावेळी अनेकांनी त्याला प्रश्न विचारले होते. त्यावेळी तो म्हणाला होता की, वेळ आल्यावर मी सगळ्या गोष्टी्ंचा खुलासा करेन. आता अखेर त्याने मोठा खुलासा केला आहे.

मी माझ्या वडिलांना एका छोट्या घरात सोडले आणि मी मात्र माझे लक्झरी आयुष्य जगतोय, असे अनेकांना वाटते. पण तसं नाहीये. त्यांनी स्वत:च २० वर्षांपूर्वी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला होता, असा खुलासा गश्मीरने केला आहे.

एक कुटुंब म्हणून आम्ही त्यांना थांबवू शकलो नाही. आम्ही त्यांचं वेगळं राहणं स्वीकारलं कारण आम्हाला त्यांच्यावर सक्ती करायची नव्हती. ते पाहिजे तेव्हा आमच्याकडे राहायला यायचे आणि त्यानंतर काही दिवसानंतर ते निघून जायचे, असेही गश्मीरने म्हटले आहे.

जेव्हा माझा पहिला चित्रपट रिलीज झाला होता, तेव्हा ते खुप दिवस आमच्यासोबत राहिले होते. ते खुप मुडी होते, ते स्वत:ची कामे स्वत:च करायचे. त्यामुळे आम्ही त्यांच्या केअर टेकरची निवड केली, तरीही ते एक दोन दिवसांमध्ये त्याला काढून टाकायचे, असेही गश्मीरने म्हटले आहे.

गेल्या तीन वर्षांपासून बाबांनी सर्व कुटुंबाला स्वत:पासून लांब केले होते. मित्रांशी बोलणं, मॉर्निंग वॉकला जाणं त्यांनी बंद केलं होतं. कदाचित त्यांच्या त्यांच्या मृत्यूची जाणीव झाली होती. मला इतकेच सांगायचे आहे. मला अधिक काहीही स्पष्ट करायचे नाही, असेही गश्मीरने म्हटले आहे.