राज्यात राजकीय वातावरण तापलेले असतानाच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केज तालुक्यात रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या एका कलाकेंद्रात वेश्याव्यवसाय सुरु असल्याचे समोर आले आहे.
सहायक पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाला याबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी या कला केंद्रावर छापा टाकला होता. आता याप्रकरणांतून काही अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात आली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रत्नाकर शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
रत्नाकर शिंदेही त्याठिकाणी होती, पण छाप्याची माहिती मिळताच ते त्याठिकाणाहून निघून गेले. पण त्यांची गाडी पोलिसांना सापडली असल्यामुळे त्यांच्यावर संशय आला. तसेच त्यांचा फोनही मिळाला. ते कला केंद्रामध्ये पार्टनर असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी याप्रकरणी एकूण ३६ लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच पीडितेचा जबाबही नोंंदवून घेतला आहे. मुलगी अल्पवयीन आहे, ती दलित समाजाची आहे, हे माहित असतानाही तिच्यावर दबाव टाकत हे केले असल्याचे पोलिसांनी गुन्हा दाखल करताना म्हटले आहे.
अशात याप्रकरणी ठाकरे गटानेही रत्नाकर शिंदे यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. रत्नाकर शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच पक्ष कार्यालयाने त्यांना जिल्हाप्रमुख पदावरुन हटवले आहे.