जालन्यातील एका तरुणाने एक स्वप्न बघून त्याचा पाठलाग केला. नंतर त्याचे हे स्वप्न सत्यात उतरले आहे. गोलापांगरी गावाजवळील गोला या वडारवाडीतील तरुण अविनाश रामू पवार हा पोलीस दलात भरती झाला, यानंतर त्याच्या घरच्यांना आनंद गगनाला मावेनासा झाला.
गावकऱ्यांनी त्याची वाजत गाजत मिरवणूक काढली. अविनाश हा पोलीस झालेला वडारवाडीतील पहिलाच तरूण ठरला आहे. यामुळे हा आनंद काही वेगळाच होता. जालना येथील वडारवाडी या वस्तीतील वडार समाज हा पारंपरिक दगड फोडण्याचे काम करतो.
दरम्यान, गोला या वडार वस्तीतील रामू पवार हे सुद्धा दगड फोडण्याचे काम करतात. रामू पवार यांनी दगड फोडण्याचे काम मुलांच्या आयुष्यात येऊ नये म्हणून अविनाश व अभिषेक या दोन मुलांना चांगले शिक्षण देयचे ठरवले.
मुलांच्या शिक्षणाचे महत्व ओळखून मुलांना दगड फोडीच्या कामाला न जुंपता शिक्षण घेऊन काहीतरी बनण्याचे सतत पाठबळ दिले.आई वडिलांच्या पाठिंब्यावर त्यांचा मुलगा अविनाश याने मोठे होऊन पोलीस होण्याचे ठरवले.
शिक्षणात खंड न पडू देता अविनाशने बी.एससी पर्यंतचे शिक्षण घेतले. तर धाकट्या अभिषेकने बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. अविनाशने कठोर मेहनत घेतली. २०१६ पासून तो पोलीस भरतीची तयारी करीत होता. मात्र, त्याला यश त्याला हुलकावणी देत होते.
दरम्यान, २०२३ मध्ये पोलिस दलात पोलीस शिपाई पदाची परीक्षा दिल्यानंतर अविनाशच्या मेहनतीला फळ आले. त्याने केलेला नियमित सराव आणि जिद्दीच्या जोरावर अविनाश पोलिस दलात भरती झाला. ही बातमी त्याने सर्वांना सांगितली तेव्हा सर्वांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले.