योगींच्या युपीत द्वेषाचे धडे, शिक्षिकेने भर वर्गात हिंदू विद्यार्थ्यांना दिले मुस्लिम वर्गमित्राला मारायचे आदेश

गेल्या काही दिवसांपासून देशात द्वेषाचे राजकारण, जातीपातीचे राजकारण घडताना दिसत आहे. आता उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगर येथील एका शाळेत संतापजनक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. एका शिक्षिकेने वर्गातील मुस्लीम विद्यार्थ्याला सर्वांसमोर उभे केले.

यानंतर शिक्षिकेने वर्गातील उर्वरित विद्यार्थ्यांना एक एक करून समोर येत या मुस्लीम विद्यार्थ्यांला मारण्यास सांगितले. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. तसेच मुस्लीम धर्मावर वादग्रस्त वक्तव्य केल्याचेही समोर आले आहे. हा संतापजनक प्रकार मनसुरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खुब्बारपूर गावातील शाळेत घडला.

विद्यार्थी मुस्लीम विद्यार्थ्याला मारत असल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या विडिओमध्ये आरोपी शिक्षिका वर्गातील विद्यार्थ्यांमध्ये मुस्लीम विद्यार्थ्यांविषयी द्वेष निर्माण करताना दिसत आहे. यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

या आरोपी शिक्षिकेचे नाव त्रिप्ता त्यागी असे आहे. आरोपी शिक्षिकेने मुस्लीम विद्यार्थ्याला सर्वांसमोर उभे केले. यानंतर वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना समोर येऊन या विद्यार्थ्याला मारण्यास सांगितले. तसेच मी तर आता जाहीर केलं आहे की, या मुस्लीम मुलांनी त्यांच्या भागात (मुस्लीम वस्तीत) जावे.

शिक्षिकेच्या आदेशानंतर वर्गातील एका मुलाने पीडित मुस्लीम मुलगा रडत असतानाही त्याच्या तोंडावर चापट मारली. यानंतर शिक्षिका त्या मुलाला म्हणाली की, तू असे काय मारतो आहेस, जोरात मार. यानंतर आणखी दोन मुले उठली आणि त्यांनीही पीडित मुलाला मारहाण केली.

यानंतर शिक्षिका म्हणाली की, चला मारण्याचे आणखी कोण बाकी आहे. आता पाठीवर मारा. तोंडावर मारल्याने त्याचे लाल होत आहे. त्यामुळे तोंडावर मारू नका. सर्वांनी पाठीवर मारा. यामुळे याबाबत कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पोलीस प्रशासन आणि शिक्षण विभाग आरोपी शिक्षिका आणि तिच्या मालकीच्या नेहा पब्लिक स्कुल या शाळेविरोधात कारवाईबाबत आता काय निर्णय घेणार हे लवकरच समजेल. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.