अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडामधील मुख्य स्वयंभू लिंगाचा आणि घोड्याचा गाभारा उद्यापासून दुरुस्तीच्या कामासाठी दीड महिने बंद राहणार आहे. यामुळे याठिकाणी तुम्हाला जाता येणार नाही.
या काळात गडावर आलेल्या भाविकांना कासवापासून देवाचे दर्शन घ्यावे लागणार आहे. दोन्ही गाभाऱ्यात जाता येणार नाही. याबाबत प्रशासनाने माहिती प्रशासनाने दिली आहे. मात्र गडामध्ये कुलधर्म कुलाचार करण्यास कोणतीही अडचण नाही.
याबाबत माहिती अशी की, २६ ऑगस्टपासून ५ ऑक्टोंबरपर्यंत गाभारा दुरूस्तीचे काम चालणार आहे. देवस्थानचे मुख्य विश्वस्त पोपटराव खोमणे यांनी याबाबत माहिती दिली आहे. याठिकाणी महाराष्ट्र शासनातर्फे विकास आराखड्याची कामे सुरू आहे.
यासाठी १०७ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर झाला आहे. गडावर विविध विकास कामे वेगात सुरू आहेत. यामुळे ही कामे आता या काळात केली जाणार आहेत. याबाबत एक बैठक आयोजित करण्यात आली होती.
यामध्ये पुजारी सेवक, ग्रामस्थ, खांदेकरी-मानकरी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी मुख्य विश्वस्त पोपटराव खोमणे, पांडुरंग थोरवे, डॉ.राजेंद्र खेडेकर, अनिल सौंदाडे, मंगेश घोणे, विश्वास पानसे, अभिजीत देवकाते व्यवस्थापक राजेंद्र जगताप, प्रमोद चव्हाण उपस्थित होते.
दरम्यान, मुख्य गाभाऱ्याचे काम सुरु असताना गडावर येणाऱ्या भाविकांच्या अभिषेक महापूजा या पंचलिंग भुलेश्वर मंदिरात करण्यात येणार आहेत. आतील गाभाऱ्याचे काम पूर्ण झाल्यावर पंचलिंग मंदिराचे काम करताना भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मुख्य मंदिरात पूजा करु द्याव्यात, अशी मागणी केली आहे.