नगरमध्ये घडलं आक्रीत! गावातील पोरांनी दहशतीने लग्न मोडल्यामुळे तरुणाने संपवले जीवन

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे राहणाऱ्या तरुणाचे जमलेले लग्न मोडले. त्यातच गावातील काही मंडळींनी त्याला ग्रामपंचायत कार्यालयात बोलावून दमबाजी केली. यामुळे तरुण घाबरला.

नंतर त्याने वडगावपान शिवारात झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या केली. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. त्याने एक सुसाईट नोट देखील लिहून ठेवली आहे. यावरून पोलिसांनी चौघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नितीन सीताराम खुळे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. गावातील लोकांनी ग्रामपंचायत कार्यालयात नितीन खुळे याला बोलावू घेऊन दमदाटी केली. दमदाटी करणारे ग्रामपंचायतचे पदाधिकारी नाहीत, तरीही ग्रामपंचायतमध्ये हस्तक्षेप करतात.

दरम्यान, नितीन खुळे याला लग्नासाठी मुलगी पाहिली होती. तिच्याबरोबर लग्न करण्याचे ठरले होते. मात्र मुलीच्या घरच्यांनी नंतर लग्न मोडल्याचे कळवले. मुलीचे लग्न संदीप शिवाजी दिघे याचे बरोबर होणार असल्याचे कळाल्याने नितीन यास राग आला.

यानंतर हा वाद वाढतच गेला. त्याने संदीप यास शिवीगाळ केली. त्यानंतर नितीन यास ग्रामपंचायतीमधून फोन आला. त्याला ग्रामपंचायतीमध्ये बोलावून घेण्यात आले. याठिकाणी त्याला दमदाटी करण्यात आली. तसेच धमकी देण्यात आली.

त्यानंतर नितीन याने कानिफनाथ जंगलातील एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले. त्याच्याकडे एक डायरी सापडली. यामध्ये प्रदीप भाऊसाहेब शिंदे, संदीप उर्फ संतोष शिवाजी दिघे, पोपट उर्फ बाजीराव सावळेराम कोल्हे, नानासाहेब कोल्हे यांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.