नात्यातल्या महिलेसोबत अनैतिक संबंध, मिटवायला बोलावलं अन् घात झाला, पुण्यात महावितरणच्या अधिकाऱ्यासोबत भयानक कृत्य

पुण्यात महावितरणमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हा खून अनैतिक संबंधाचा संशय आणि याआधी झालेल्या वादातून करण्यात आल्याची माहिती आहे.

गोपाळ कैलास मंडळे (वय ३२, रा. ओवी अंगण कॉलनी, जाधवनगर, रायकर मळा) असे खून झालेल्या तरुणचे नाव आहे. तसेच या हत्येप्रकरणी पोलिसांनी सिद्धांत दिलीप मांडवकर या संशयिताला ताब्यात घेतले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

याबाबत माहिती अशी की, महावितरणमध्ये गोपाळ मंडळे हे वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून नोकरीस होते. त्यांची महावितरणच्या सिंहगड रोड विभागात नेमणूक होती. मागील चार वर्षांपासून मंडळे हे रायकर मळा येथे कुटूंबासोबत राहत होते. मांडवकर याचे नात्यातल्या एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय मंडळे यांना होता.

यामुळे त्यांच्यात वाद झाला होता. वाद मिटवण्यासाठी खंडोबा मंदिर रोड परसिरात ते आले असताना परत त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी मांडवकर याने चाकूने मंडळे यांच्या गळ्यावर वार केले. यामध्ये ते मृत्युमुखी पडले.

मंडळे यांचा खून केल्यानंतर मांडवकर हा तेथून फरार झाला होता. याठिकाणी असलेल्या लोकांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली होती. ही घटना भरदिवसा रस्त्यावर घडली. सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, जयंत राजुरकर सध्या तपास करत आहेत.

ही घटना पुण्यातील सिंहगड रोड भागातील रायकर मळा परिसरात दुपारी मनोहर गार्डनजवळ खंडोबा मंदीर रोड परिसरात घडली आहे. दिवसाढवळ्या ही घटना घडल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.