खोल्यांचं पत्र्याचं घर, आरक्षणासाठी जमीनही विकली, मनोज जरांगेंच्या गरिबीची कथा वाचून डोळ्यात पाणी येईल

जालना जिल्ह्यातून सुरू झालेल्या मराठा आंदोलनातील केंद्रस्थानी असणारे मनोज जरांगे यांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मराठ्यांना जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही. असे म्हणत त्यांनी सरकारला घाम फोडला आहे. यामुळे सगळीकडे त्यांचीच चर्चा सुरू आहे.

मनोज जरांगे पाटील यांची वैयक्तिक परिस्थिती काही फारशी बरी नसल्याचे समोर आले आहे. रोजगार आणि शिक्षणाच्या संधीअभावी वंचित राहिलेल्या मराठवाड्यातील अनेक मराठा कुटुंबांप्रमाणेच मनोज जरांगे यांच्या घरची परिस्थिती नाजूक आहे.

शहागड येथे त्यांचे पत्र्याचे घर आहे. दोन खोल्यांमध्ये त्यांचा संसार चालतो. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात त्यांनी दोन एकर शेतीही विकली आहे. गेल्या आठ दिवसांपासून ते अंतरवाली सराटी या गावात उपोषणाला बसलेले आहेत.

सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे. आपले वडील लवकरात लवकर घरी यावेत, अशी इच्छा त्यांच्या मुलांनी बोलून दाखवली.

अनेकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते पहिल्यापासूनच तयार असतात. ते एक अल्पभूधारक शेतकरी आहेत. बारावीपर्यंत शिकलेल्या जरांगे यांनी विविध आंदोलने केली. अगदी गेल्या काही महिन्यात अनेक गावात उपोषण केले. त्यांच्या आंदोलनाला किंवा उपोषणाला मोठी गर्दी होत असते.

गावातील लोक त्यांच्या आंदोलनात सहभागी होते. मनोज जरांगे पाटील यांनी शिवबा ही संघटनाही स्थापन केली. जरांगे हे शहागडच्या मध्ये एका छोट्या घरात राहतात. अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथेही त्यांनी उपोषण केले होते.

या आंदोलनाचीही चर्चा झाली होती.तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना चर्चेसाठी मुंबईत बोलवले होते. ते पूर्णवेळ मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी काम करतात. अनेकांचे प्रश्न त्यांनी सोडवले आहेत.