अकोला शहरातील बलोदे लेआऊट येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी नाकाला चिमटा लावून मुलगी झोपल्याचा बनाव एका आईने केला. मात्र नंतर सत्य परिस्थिती बाहेर आली. वैद्यकीय अहवालात हत्या झाल्याचे समोर आले. यामुळे एकच खळबळ उडाली.
घरात कोणी नसतानाच आईने तिचा काटा काढला असल्याचे समोर आले आहे. असे असताना आईने मुलीला का संपवले, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणात अकोल्यातील खदान पोलिसांनी मुलीच्या आईला ताब्यात घेतले आहे.
किशोरी रवी आमले (वय ५) असे मृत मुलीचे नाव असून विजया आमले असे मारेकरी आईचे नाव आहे. याबाबत तपास सुरू आहे. दरम्यान, लग्नापासून पती-पत्नीमध्ये वाद होते. पत्नीने पतीला घटस्फोटाची मागणी देखील अनेकदा केली आहे.
याबाबत आईने सुरुवातीला सांगितले की, किशोरी नाकाला चिमटा लावून झोपली आणि तिचा मृत्यू झाला. मात्र किशोरीच्या वडिलांनी आईवरच संशय व्यक्त केला होता. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.
दरम्यान, नंतर किशोरीची वैद्यकीय तपासणी केली. यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली. यामध्ये तिच्या अंगावर आणि शरीरावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्या. यामुळे आईनेच तिला मारल्याचे समोर आले.
आता किशोरीची आई विजया आमले हिच्याविरोधात हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत नेमकं कारण तपासण्यासाठी पोलीस अधिकारी तपास करत आहेत.