जालन्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी लहान भावजयीसोबतच्या अनैतिक संबंधाला अडथळा ठरणाऱ्या पत्नीचा खून केल्यानंतर घाबरलेल्या पतीने विषारी औषध प्राशन केले. यामुळे मोठी पळापळ झाली. याबाबत पोलीस तपास करत आहेत.
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील कुंभारी या गावी ही घटना घडली आहे संशयित आरोपी पतीची परिस्थिती गंभीर आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत माहिती अशी की, आशा हिचा विवाह 20 वर्षांपूर्वी भोकरदन तालुक्यातील कुंभारी येथील रतन सांडू साळवे याच्या सोबत झाला होता.
रतन साळवे याचे त्याच्या लहान भावजयी सोबत अनैतिक संबंध होते. यामुळे सतत वाद होत होता. त्यामुळे तो पत्नी व मुलांना नेहमी त्रास देऊन मारहाण करीत होता. अनेकदा त्याच्या त्रासाला कंटाळून आशा साळवे ही आपल्या माहेरी जात होती.
तिच्या भावाने देखील याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, कामासाठी ते बाहेर राहत होते. कुंभारी ग्रामपंचायतीची निवडणूक असल्याने हे दोघे पती, पत्नी मतदानासाठी कुंभारी येथे आले होते. शनिवारी सायंकाळी रतन साळवे यांचे घर बंद होते. मात्र खिडकी उघडी होती.
घराशेजारी खेळत असलेल्या एका लहान मुलीने खिडकीतून आत बघितले. यावेळी आशा साळवे ही जखमी आणि खाली पडलेली दिसून आली. तिच्या तोंडातून रक्त येत होते. याबाबत लगेच पोलिसांना माहिती देण्यात आली.
दरम्यान, संशयित पतीला भोकरदन येथून बहिणीच्या घरून ताब्यात घेतल्याचे पोलीसांनी सांगितले. त्याने स्वतःही विषारी औषध घेतले होते. त्याला भोकरदन ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.