पुण्यात MPSC चा विद्यार्थी लायब्ररीतून घरी जात होता, तितक्यात तिघांनी अडवलं, कोयता काढला अन्…

पुण्यात एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर तीन गर्दुल्यांनी वार केल्याची खळबळजनक घटना मध्यरात्री दोनच्या सुमारास घडली आहे. यामुळे याचा तपास सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच अशाच प्रकारची घटना पुण्यातच घडली होती.

याबाबत माहिती अशी की, फिर्यादी आणि त्याचे मित्र सुभाष शेवाळे आणि ओम विलास भिलारे याच्यासोबत खजिना वीर परिसरातून रात्री उशिरा लायब्ररी मधून घरी जात होता. यावेळी ऍक्टिवा गाडीवरून आलेल्या तीन आरोपींपैकी एकाने कॉलर पकडून गाडी जवळ घेऊन गेला.

यानंतर गाडीवर ठेवलेला लोखंडी कोयता फिर्यादीच्या डोक्यात घालून त्याला ठार मारण्याच्या प्रयत्न केला. आदित्य उर्फ आदी जीवन गायकवाड, पानमळा वसाहत सिंहागड रोड पुणे, साहिल उर्फ ब्लॅकी शंकर वाघमारे, पानमळा वसाहत सिंहागड रोड पुणे, अनिकेत उर्फ ऑन्डी संग्राम सरोदे, पानमळा वसाहत सिंहागड रोड पुणे असे या आरोपींचे नाव आहे.

त्या तीन आरोपींविरोधात गुन्हा दाखल आहे. पुढील तपास विश्रामबाग पोलीस करत आहे. पोलिसांनी गुन्हा घडल्यापासून अवघ्या दोन तासात आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, विद्येचे माहेरघर ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात विद्यार्थी असुरक्षित असल्याच्या घटना घडत आहे.

टिळक रोड सदाशिव पेठ परिसरत एका महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर एका तरुणाने भरदिवसा कोयत्याने वार केल्याची घटना चर्चेत असताना ही घटना घडली आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.