शिवसेना नेते सुधीर मोरे मृत्यूप्रकरणात धक्कादायक माहिती उघड; प्रकरणाला वेगळे वळण

काही दिवसांपूर्वी मुंबईमधून एक धक्कादायक घटना समोर आली होती. यामुळे एकच खळबळ उडाली. मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, माजी नगरसेवक सुधीर मोरे यांनी आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडला होता.

घाटकोपर रेल्वे स्टेशनजवळ रुळावर त्यांचा मृतदेह आढळला. यामुळे याची सध्या चर्चा सुरू झाली आहे. ते ठाकरेंचे कट्टर समर्थक मानले जात होते. त्यांच्या मृतदेहाचे अनेक तुकडे झाले होते.

दरम्यान, याबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी नीलिमा सावंत ऊर्फ चव्हाणवर गुन्हा दाखल केला आहे. ती माजी आमदाराची कन्या आहे. तसेच राजकारणातही सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळून लावला.

दरम्यान, मोरे व आरोपी यांच्यात वाद होते. माझ्याशी संबंध ठेवले नाही आणि माझ्याशी बोलणे थांबवले तर मी माझे आयुष्य संपवेन, अशी धमकी आरोपी नीलिमा यांनी मोरे यांना दिली होती. तसेच आत्महत्येच्या दिवशी दोघांमध्ये ५६ फोन कॉल झाले. आपला छळ थांबवण्याची विनंती मोरे यांनी आरोपीला केली.

असे असताना मोरे टोकाचे पाऊल उचलत असतानाही आरोपीने त्यांच्याशी फोनवर बोलत छळवणूक सुरूच ठेवली होती, अशी देखील माहिती समोर आली आहे. यामुळे मोरे यांनी हे धक्कादायक पाऊल उचलले असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, रात्री त्यांना एक फोन आला आणि मी एका वैयक्तिक कामानिमित्त जात आहे असे त्यांनी सुरक्षारक्षकाला सांगितले. नंतर ते घराबाहेर पडले. त्यांनी याबाबत दुसरे कोणाला सांगितले नव्हते. ते गाडी न घेता रिक्षाने गेले होते. घाटकोपर आणि विद्याविहारच्या मध्ये असलेल्या पुलाखाली गेले.

तिथे ते रुळावर झोपले. मोटरमनने कोणीतरी ट्रॅकवर झोपल्याचे पाहून वेग कमी करण्याचा प्रयत्नही केला. मात्र वेगात असलेली लोकल त्यांच्यावरुन गेली आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. सुधीर मोरे हे ठाकरे गटाचे रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्कप्रमुख होते. सुधीर मोरे हे मुंबईत शिवसेनेचे नगरसेवक आणि ईशान्य मुंबईचे माजी विभागप्रमुखही होते.