एक गुंठाही जमीन नाही, राहायला एकच पत्र्याची खोली; परिस्थितीवर मात करून शिवम बनला पोलिस अधिकारी

घरच्या परिस्थितीची जाण आणि मेहनत केली की सगळं काही शक्य होत हे कराड तालुक्यातील चरेगाव येथील २६ वर्षीय शिवम विसापूरे याने दाखवून दिले आहे. त्याने थेट पोलिस उपअधिक्षक पदाला गवसणी घातली आहे. यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.

त्याच्या घरची परिस्थिती बेताची आहे. राहायला एकच पत्र्याची खोली. तसेच कुटुंबाला अवघी एक गुंठाही शेतजमीन नाही. अशा हलाखीच्या परिस्थिती देखील त्याने हे यश मिळवले आहे. यामुळे सर्व स्थरातून त्याचे अभिनंदन केले जात आहे.

शिवमचे वडिल दत्तात्रय विसापूरे यांनी तासवडे एम. आय. डी. सी मध्ये नोकरी केली. तसेच आई ही आशा सेविका म्हणूनही काम करते. यामुळे घरी जेमतेम पैसे मिळत होते. यामुळे अशा परिस्थितीत त्याने अभ्यास करून हे यश मिळवले आहे.

वडिलांची अनेकदा नोकरीही गेली. तेव्हा आईने मोठे कष्ट देखील केले. त्यांनी ही जबाबदारी पार पाडत संसाराचा गाडा ओढला. यामुळे या यशामागे त्याच्या आईचा मोठा हात आहे. त्यांनी मुलाच्या शिक्षणात कधी काटकसर केला नाही. त्यांनी मुलाला देखील उच्च शिक्षित केले.

शिवमने कराडच्या शासकीय अभियांत्रिकी कॉलेजमधून मॅकेनिकल इंजिनिअरिंगमधून डिप्लोमा पूर्ण करून पुढे पुणे येथील कॉलेजमधून मॅकेनिकल इंजिनिअरिंगची डिग्री घेतली आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले.

परिस्थितीवर मात करण्यासाठी शिवमने शासकीय अधिकारी ठरवले. त्याने पुण्यात राहून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. दुसऱ्या प्रयत्नात शिवम नायब तहसीलदार बनला. नंतर पुन्हा एकदा परीक्षा देऊन पोलीस उपअधिक्षक झाला. यामुळे आता त्याचे आणि त्याच्या कुटूंबाचे दिवस बदलणार आहेत.