आजारी आईला भेटण्यासाठी निघाला, पण वाटेतच घडलं भयंकर; काळजाचा तुकडा जग सोडून गेला

जळगावमधून एक दुःखद घटना समोर आली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. याठिकाणी आजारी आईला भेटण्यासाठी मुलगा पुण्याहून लगबगीने निघाला. मात्र, रस्त्यातच काळाने डाव साधला. अपघातात या तरुणाने जीव गमवला आहे.

एका भरधाव कारने त्याच्या दुचाकीला दिलेल्या जोराच्या धडकेत त्याचा मृत्यू झाला. त्याची आईसोबतची भेट अखेर अधुरीच राहिल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. जळगाव रस्त्यावर फरशी फाटा येथे हा अपघात झाला.

दरम्यान, मुलाची वाट पाहत बसलेल्या आईला त्याचे पार्थिव पाहण्याची वेळ आली. यामुळे आईला मोठा धक्का बसला. समाधान विठ्ठल राऊत असे या घटनेतील मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. हा तरुण पुणे येथे एका हॉटेलमध्ये कामाला होता. गावाकडे काही दिवसांपासून त्याची आई आजारी होती, यामुळे तो भेटण्यासाठी निघाला होता.

जळगाव महामार्गाने सिल्लोडकडे जात असताना फरशी फाटा येथे समोरून येणाऱ्या कारने त्याच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यामध्ये त्याच्या डोक्याला मोठा मार लागला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मुलगा येणार असल्याने वाट पाहणाऱ्या आईसमोर त्याचा मृतदेह आल्याने आईने हंबरडा फोडला. या घटनेची नोंद वडोदबाजार पोलिस ठाण्यात करण्यात आली. पुढील तपास पोलीस करत आहेत.