टीम इंडिया आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील Asia Cup Final सामना आज कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर सुरू झाला. तत्पूर्वी, श्रीलंका क्रिकेट संघाचा कर्णधार दासुन शनाका याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु त्याचा हा निर्णय अत्यंत वाईट ठरला.
टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात कुसल परेराची विकेट घेत यजमान संघाला मोठा धक्का दिला. मात्र त्यानंतर मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीचा कहर पाहायला मिळाला. श्रीलंकेचा संपुर्ण संघ ५० धावांत ऑलआऊट झाला.
मोहम्मद सिराजने श्रीलंकेविरुद्धच्या आशिया कप २०२३ च्या अंतिम सामन्यात घातक गोलंदाजीचे उदाहरण घालून दिले. त्याने श्रीलंकेच्या दिग्गज फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. सामना पाहताना सिराज श्रीलंकेच्या फलंदाजांविरुद्ध काही जुना बदला घेत आहे, असे वाटत होते.
मोहम्मद सिराजने आशिया चषक 2023 च्या अंतिम सामन्यात गोलंदाजीने कहर केला. विशेषत: चौथ्या षटकात जिथे त्याने एकाच षटकात 4 बळी घेत श्रीलंकेच्या अर्ध्या फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले आणि श्रीलंका संघाचे कंबरडे मोडले.
या सामन्यात मोहम्मद सिराजने एकूण 6 विकेट घेतल्या. त्याची घातक गोलंदाजी पाहून चाहते त्याचे खूप कौतुक करत आहेत. तसंच ते श्रीलंकेला त्यांच्या खराब फलंदाजीसाठी ट्रोल करत आहेत.
Asia Cup Final मध्ये भारताचा विश्वविक्रम
श्रीलंकेचा संपूर्ण संघ 50 धावांवर बाद झाला. ही श्रीलंकेची भारताविरुद्धची वनडेतील सर्वात कमी धावसंख्या आहे. याआधी, या वर्षी जानेवारीमध्ये भारताने श्रीलंकेला 22 षटकांत 73 धावांत गुंडाळले होते.
एवढेच नाही तर भारताविरुद्धच्या वनडेमधली ही कोणत्याही संघाची सर्वात कमी धावसंख्या आहे. यापूर्वी बांगलादेशने 2014 मध्ये मीरपूरमध्ये भारताविरुद्ध 58 धावा केल्या होत्या. 50 धावा ही कोणत्याही वनडे फायनलमधील सर्वात कमी धावसंख्या आहे.
यापूर्वी शारजाह येथे झालेल्या आशिया कप 2000 मध्ये भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध 54 धावांत आटोपला होता. आता श्रीलंकेने यापेक्षाही कमी धावसंख्या उभारली आहे. म्हणजेच श्रीलंकेने केलेली 50 धावांची धावसंख्याही आशिया चषकातील सर्वात कमी धावसंख्या आहे.
टीम इंडियाकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 6 विकेट घेतल्या. तर हार्दिक पांड्याने 3 आणि जसप्रीत बुमराहने 1 विकेट घेतली. डावाच्या चौथ्या षटकात मोहम्मद सिराजने प्रथम पथुम निशांकाला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला, त्यानंतर दोन चेंडूंनंतर सदीरा समरविक्रमा शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला.
शेवटच्या सामन्याचा हिरो असलेल्या चरित असलंकालाही पहिल्याच चेंडूवर इशान किशनने झेलबाद केले पण पुढच्याच चेंडूवर धनंजय डी सिल्वाने चौकार ठोकला. मात्र, सिराज इथेच थांबला नाही, त्याने षटकाच्या शेवटच्या चेंडूवर धनंजयला बाद करून श्रीलंकेला धक्का दिला.
सिराजने एकाच षटकात 4 बळी घेण्याचा पराक्रम केला असून एकदिवसीय क्रिकेटमध्ये असा विक्रम करणारा तो तिसरा आणि पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.
१९३२ मध्ये भारताने क्रिकेट विश्वात प्रवेश केला. पण, 91 वर्षांच्या इतिहासात आजपर्यंत भारतीय क्रिकेटमध्ये असा एकही गोलंदाज दिसला नाही ज्याने एका षटकात 4 विकेट्स घेऊन विरोधी संघाचा नाश केला असेल. अंतिम फेरीत सिराजने अवघ्या 16 चेंडूत आपले पंजे उघडले आणि श्रीलंकेच्या संघाला उद्ध्वस्त केले.