गडचिरोली जिल्ह्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथील जिमलगट्टा पोलिसांनी १६ सप्टेंबर रोजी नाकाबंदी करत देशी दारुसह तब्बल २५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. जिल्ह्यात दारूबंदी असताना देखील अशा घटना घडत आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
ही कारवाई सिरोंचा-आलापल्ली राष्ट्रीय महामार्गावर करण्यात आली. यातील आरोपी कैलास मडावी याला ताब्यात घेऊन गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
पोलिसांना राष्ट्रीय महामार्गावर दारू तस्करी होणार असल्याची माहिती मिळताच नाकाबंदी करण्यात आली. याबाबत एका जड वाहनाची झडती घेतली असता रॉकेट कंपनीचे संत्रा देशी दारुचे २७० बॉक्स वाहतूक करताना आढळले. यामुळे पोलीसच हादरून गेले.
दरम्यान, पोलिसांनी दारूची किंमत १० लाख तसेच सदर वाहनाची किंमत १५ लाख असे एकूण २५ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याबाबत ट्रकचालकाला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. सिरोंचा ते अल्लापल्ली या राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे.
असे असताना मात्र या जड वाहनातून मोठ्या प्रमाणात अवैध दारू तस्करी होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे याची चर्चा सुरू आहे. गडचिरोली पोलिसांनी गांजा व अवैध दारू तस्करीवर अंकुश ठेवण्यासाठी कारवाईचा बडगा उगारला आहे.
ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर, प्रभारी अधिकारी संगमेश्वर बिराजदार व इतर स्टाफ यांनी केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्वर बिराजदार हे करीत आहेत. पुढील काळात देखील याठिकाणी अशीच कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.