पोटच्या पोरानेच वडिलांची हत्या केल्याची घटना पुण्यात घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. वडिलांनी काम कर असे सांगितल्याने मुलाला राग आला, यामुळे त्याने हे कृत्य केले. पुण्यातील विश्रांतवाडी परिसरातून हा प्रकार समोर आला आहे.
याबाबत माहिती अशी की, आरोपी शिवनाथ सध्या शिक्षण घेत नव्हता तसेच कोणता कामधंदे करत नव्हता. त्यामुळे वडील लक्ष्मण यांनी त्याला काम करण्यास सांगितले होते. यामुळे त्याला याचा राग आला.
वडिलांनी काम कर, चांगले रहा, असे सांगितले. मध्यरात्री लक्ष्मण मंजुळे हे गाढ झोपेत होते. त्यावेळी मध्यरात्री दीडच्या सुमारास शिवनाथने झोपेत असलेल्या वडिलांवर घरातील धारदार कात्रीने छाती आणि पोटावर अचानक जीवघेणा वार केले. यातच त्यांचे निधन झाले.
या प्रकारामुळे विश्रांतवाडीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर आईने पतीला वाचवण्यासाठी धडपड केली असता, शिवनाथने आईच्या हातावर कात्रीने वार केले. यामुळे आईदेखील जखमी झाली आहे.
दरम्यान, शिवनाथला अटक करण्यात आली असून, पोलिस निरीक्षक भालचंद्र ढवळे याबाबत पुढील तपास करत आहेत. लक्ष्मण सुरेश मंजुळे (वय -55, रा. मास्टर काॅलनी, टिंगरेनगर,पुणे) असे खून झालेल्या वडिलांचे नाव आहे.
याबाबत मुलगा शिवनाथ लक्ष्मण मंजुळे (वय -20) याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. याबाबत शिवनाथचा मामा बाबू दांडेकर यांनी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. या घटनेमुळे मात्र कुटूंबाला मोठा धक्का बसला आहे.