जालना शहरातील एका व्यक्तीने आपल्याच छोट्या मुलीचे अपहरण केल्याची घटना उघडकीस आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली. शहरातील कांचननगर येथील महिलेचा विवाह अकोला येथील योगेश नरेंद्र परमार याच्यासोबत झाला होता. त्यांना एक मुलगी आहे. ती सध्या साडेपाच वर्षांची आहे.
असे असताना मात्र पती-पत्नीत सतत वाद होत होते. नंतर त्यांनी न्यायालयामार्फत अडीच वर्षांपूर्वी घटस्फोट घेतला. यावेळी न्यायालयाने मुलीचा ताबा आईकडे दिलेला. वडिलांना महिन्यातून दोनदा ठरलेल्या वेळेत कौटुंबिक न्यायालयाच्या आवारात मुलीला भेटण्याची परवानगी दिलेली होती.
असे असताना मुलीच्या बापाने मुलीचे अपहरण केले. चिमुकली शाळा सुटल्यानंतर रोजच्याप्रमाणे व्हॅनमधून घरी येत होती. मात्र व्हॅनमधून उतरल्यानंतर त्या मुलीचे एका स्विफ्ट डिझायर कारमधील तीन जणांनी अपहरण केले. याठिकाणी असलेल्या लोकांना हा प्रकार लक्षात आला.
नंतर या घटनेची माहिती ताबडतोब सर्वत्र पसरली होती. मुलीच्या आईसह नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी लगेच सूत्र फिरवून तपास केला. तपासात मुलीचे अपहरण तिच्या पित्यानेच केल्याचे तपासात समोर आले.
यामुळे सर्वांना एकच धक्का बसला. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व मोबाईल लोकेशनवरून तपास सुरू ठेवला होता. पोलीस पथकाने रात्रीच अकोला गाठून मुलीचे वडील योगेश परमार याचे घर गाठले. मात्र तो घरी आढळून आला नाही.
नंतर शहरातील सर्व हॉटेलची तपासणी केली असता, एका हॉटेलमध्ये तो आढळून आला. पोलिसांनी मुलीची सुटका करून योगेश परमार यास ताब्यात घेतले. या घटनेमुळे मात्र सगळीकडे याची चर्चा सुरू झाली आहे.