गेल्या काही दिवसांपासून राज्यात अपघातामध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आता पुणे जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. येथील नगर-कल्याण महामार्गावर भरधाव वेगात जाणाऱ्या पिकअपने पायी जाणाऱ्या तरुणीसह दुचाकीला जोरदार धडक दिली.
यामध्ये तरुणीसह दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने उपचारासाठी आळेफाटा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हा अपघात सायंकाळच्या सुमारास नगर-कल्याण महामार्गावरील ओतूर परिसरामध्ये घडला. ऐन गणेशोत्सवाच्या काळात अशी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत घरच्यांना माहिती मिळाल्यावर त्यांना एकच धक्का बसला.
याबाबत ऋतुजा अशोक डुंबरे (वय १९ वर्ष) आणि सविता गीताराम तांबे (वय ४५ वर्ष) अशी मृत महिलांची नावे आहेत. तर गीताराम नामदेव तांबे (वय ५२ वर्ष) हे जखमी झाले आहेत. मृत ऋतुजा डुंबरे ही रस्त्याने घरी चालत जात होती.
त्याचवेळी गीताराम तांबे आणि त्यांची पत्नी सविता हे दोघे पती-पत्नी दुचाकीवरुन आळेफाट्याच्या दिशेने जात होते. भरधाव वेगात आलेल्या पिकअपने रस्त्याने चाललेल्या तरुणीसह आणि दुचाकीवरील पती-पत्नीला धडक दिली.
अपघातात दुचाकीवरील महिला आणि पायी चाललेल्या तरुणीचा जागीच मृत्यू झाला. त्याचवेळी पिकअप वाहन रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन पलटी झाला. अपघातानंतर पिकअप चालकाने घटनास्थळावरून धूम ठोकली. दरम्यान, पोलीस त्याचा शोध घेत आहे.
ओतूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. दोन्ही महिलांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. याबाबत पोलीस तपास करत आहेत.