कोल्हापूरमधील चंदगंड तालुक्यात तीन टक्क्याने लाच मागणाऱ्या महिला उपअभियंत्याला रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. एकीकडे गणपती बाप्पाची मिरवणूक सुरू असताना या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे मात्र खळबळ उडाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं ही कारवाई केली. या प्रकरणातील तक्रारदार ठेकेदार असून त्यांनी लाचेची मागणी झाल्यानंतर तक्रार दाखल केली होती. याबाबत माहिती अशी की, जलजीवन नळपाणी पुरवठा कामाचे 12 लाख रुपयांचे बिल मंजूर केलं म्हणून तीन टक्के कमिशनची मागणी केली होती.
यासाठी 33 हजार रुपयांची मागणी चंदगड ग्रामीण पाणीपुरवठा विभागाची उपअभियंता सुभद्रा लक्ष्मणराव कांबळेनं (रा. बेळगाव, हनुमान नगर ) केली होती. तडजोडीअंती 25,000 रुपये लाच स्वीकारताना सुभद्राला रंगेहाथ सापळा रचून पकडण्यात आले.
दरम्यान, मुळ ठेकेदारांनी जलजीवन मिशन योजनेंतर्गत चंदगड तालुक्यातील घुल्लेवाडीमधील नळपाणी पुरवठा योजना सुधारीकरणाचे काम घेतले होते. हे काम त्यांनी पूर्ण केले. यानंतर ते आपले बिल काढण्यासाठी गेले.
घुल्लेवाडीमध्ये जलजीवन नळपाणी पुरवठा कामाचे बिल मंजूर केले म्हणून तक्रारदाराकडे मंजूर केलेल्या 12 लाख रुपयांच्या बिलामध्ये सुभद्रा कांबळेने तीन टक्के दराने 33,000 रुपये लाचेची मागणी केली.
दरम्यान, लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनात पोसई संजीव बंबरगेकर, पोहेकॉ विकास माने, सुनील घोसाळकर, पोना सचिन पाटील, मपोकॉ पुनम पाटील, चापोहेकॉ विष्णू गुरव यांनी ही कारवाई केली. कोल्हापूर जिल्ह्यात सध्या याची चर्चा सुरू आहे.