उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का! आणखी चार आमदार करणार शिंदे गटात प्रवेश

सध्याचे राज्याचे राजकारण चांगलेच तापलेले आहे. असे असताना आता शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी मोठा दावा केला आहे. ठाकरे गटाचे दोन आमदार आमच्यात सामील झाले असून आणखी चार आमदार आमच्या संपर्कात आहे, असे सामंत यांनी म्हटले आहे.

उदय सामंत हे सध्या अमरावती दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. त्यावेळी बोलताना त्यांनी हा दावा केला आहे. उदय सामंत यांच्या या दाव्याने राजकारणात एकच खळबळ उडाली असून ते ४ आमदार कोण? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

ठाकरे गटाचे सहा आमदार हे आमच्या संपर्कात असल्याचे आम्ही आधीच सांगितले होते. त्यापैकी दोन आमदार हे शिंदे गटात सामील झाले आहे. अजून चार आमदार शिंदे गटात येणार आहे, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्या आमदारांबाबत राजकारणात चांगलीच चर्चा होत आहे.

अजित पवार यांनीही बंड करत सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवारांच्या येण्याने शिंदे गटात नाराजी असल्याचे म्हटले जात आहे. पण आता यावरही सामंत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. अजित पवार यांच्या येण्याने शिवसेनेत कुठलीही अस्वस्थता नाही. त्यांच्या येण्याने उलट ताकद वाढली आहे, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.

लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तारही होणार आहे. तो मंत्रिमंडळाचा विस्तार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात होणार आहे. त्यामध्ये कोणाला मंत्रिपद द्यावे याबाबत चर्चा झाली आहे. काँग्रेसचा गट येणार असल्यास त्यांनाही सत्तेत सहभागी केले जाईल, असे उदय सामंत यांनी म्हटले आहे.

विधानपरिषदेच्या आमदार मनीषा कायंदे आणि नीलम गोऱ्हे या ठाकरेंसोबत होत्या. पण काही दिवसांपूर्वीच दोघींनी एका पाठोपाठ ठाकरे गटाला रामराम ठोकला. पण आता सामंत यांनी केलेल्या दाव्यानुसार आणखी ४ आमदार ठाकरे गट सोडणार आहे. जर असे झाले तर ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का असू शकतो.