राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा खासदार आहेत. २००९ पासून त्या तीन वेळा बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. मोठ्या मताधिक्याने त्या निवडून येतात.
असे असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर काय होणार? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. अजित पवार यांच्याविरोधात काय भूमिका घेणार हे महत्वाचे ठरणार आहे. बारामतीतच ताईंची कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
असे असताना आता सुप्रिया सुळे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांच्या कार्याने पावन झालेल्या वर्धा लोकसभा क्षेत्रातून निवडणूक लढवायला नक्की आवडेल, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने वर्ध्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा वाढल्या आहेत.
दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना वर्ध्यातून लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचा विचार भाजप करत असल्याच्या चर्चा आहेत. यामुळे आता या जागेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या सुप्रिया सुळे वर्धा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
त्या म्हणाल्या, नांदेडच्या शासकीय रुग्णालयात २४ तासांत २४ जणांचा मृत्यू झाला. यात १२ नवजात बालके आहेत. केवळ ईडी, सीबीआयचा धाक दाखवून पक्ष फोडण्यात व्यस्त असलेले ट्रीपल इंजिनचे सरकार यासाठी जबाबदार आहे, असेही त्या म्हणाल्या.