Pune News : पुण्यात अपघातांची मालिका सुरूच आहे. आता पुण्यात कार चालकाने वाहनांना उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. झेड ब्रिजजवळ भरधाव चारचाकी वाहनाने पाच ते सहा वाहनांना तसेच पादचाऱ्यांना उडवल्याची घटना घडली आहे.
यात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. या घटनेतील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. रात्री साडेदहा वाजता केळकर रस्त्यावर ही घटना घडली आहे. यामध्ये दोन ते तीन दुचाकी आणि एका रिक्षाला धडक देत स्वतः एका पोलला जाऊन धडकला.
या अपघातात रिक्षाचालक देखील गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर पोलिसांनी चारचाकी चालकाला सोबत त्याच्या सहकाऱ्याला अटक केली आहे. या दोघांना विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतले असून या घटनेत विश्वनाथ उपादे यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
उमेश हनुमंत वाघमारे (४८) असे वाहन चालकाचे नाव तर नटराज बाबुराव सूर्यवंशी (४४) असे गाडीमालकाचे नाव आहे. आरोपी उमेश हनुमंत वाघमारे आणि त्याचा मित्र नटराज हे दोघे दारू पिऊन गाडी चालवत होते. नदी पात्रापासून अलका चौकच्या मार्गावर बेफाम वेगात चारचाकी अलका चौकाच्या दिशेने घेऊन जात होते.
पुढे गाडीवरचा ताबा सुटला आणि रस्त्यावर जात असणाऱ्या विश्वनाथ उपादे यांना उडवले. त्यानंतर त्यांनी दोन दुचाकींना धडक दिली. पॅसेंजर असलेल्या एका रिक्षाला धडक दिली. शेवटी एका लाईटच्या पोलाला जाऊन धडकला, आणि थांबला.