TV Blast : उत्तर प्रदेशातील आग्रा येथे टीव्ही स्फोटात झालेल्या एका जोडप्याच्या मृत्यूचे प्रकरण सध्या मीडियाच्या चर्चेत आहे. हा धक्कादायक अपघात ४ ऑक्टोबर रोजी घडला होता. ५ ऑक्टोबर रोजी उपचारादरम्यान या दाम्पत्याचा मृत्यू झाला.
4 ऑक्टोबर रोजी आग्राच्या फतेहपूर सिक्रीमध्ये 26 वर्षीय टिकम सिंग पत्नी 22 वर्षीय मिथिलेशसोबत बसून टीव्ही पाहत होते. अचानक टीव्ही मधून एक ठिणगी आली. हे जोडपे काही विचार करण्याआधीच जोरदार स्फोट झाला.
दोघांच्या आरडाओरडा ऐकून टिकमचा लहान भाऊ व स्थानिक लोक आले आणि त्यांनी आग विझवली. दोघांनाही सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, तेथे उपचारादरम्यान 5 ऑक्टोबर रोजी दोघांचा मृत्यू झाला.
अवघ्या 6 महिन्यांपूर्वीच दोघांचे लग्न झाले होते. 16 वर्षांपूर्वी मोहल्ला मुडिया खेडा येथील रहिवासी गवंडी चंदन सिंग यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अपंग आईने टिकम सिंग आणि त्यांचा लहान भाऊ निशू यांना एकट्याने वाढवले. दोन्ही भावांनी त्यांच्या सख्ख्या बहिणींशी लग्न केले होते.
याआधीही टीव्हीच्या स्फोटाच्या घटना झाल्या आहेत. ऑक्टोबर 2022 मध्ये, उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये टीव्हीचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी झाले.
जेव्हा व्होल्टेज अचानक वाढते, तेव्हा टीव्हीचा स्फोट होऊ शकतो. हे खराब वायरिंगमुळे होते. जरी आता बहुतेक टीव्ही; विशेषत: ब्रँडेड आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या टीव्हीमध्ये अशा अचानक वाढणाऱ्या व्होल्टेजचा परिणाम टाळण्यासाठी पॉवर डॅम्पर्स येऊ लागले आहेत.
अतिउष्णतेमुळे टीव्ही देखील फुटतात. तज्ज्ञांनी टीव्ही खरेदी करताना लोकल टीव्ही टाळण्याचा इशारा दिला आहे.