गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीच्या अनेक घटना समोर येत आहे. पण भिवंडीतून एक अशी बातमी समोर आली ज्यामुळे संपुर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. कॉल गर्लने एका ४२ वर्षीय व्यक्तीची हत्या केली आहे.
शिवीगाळ केल्याच्या रागातून तिने ही हत्या केल्याचे समोर आले आहे. संबंधित घटना ही भिवंडीच्या बापगावमध्ये घडली आहे. दीपक कुऱ्हाडे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो मूळ बीडचा होता, पण बापगावमध्ये इंटेरिअर डिझायनरचे काम करत होता.
पोलिसांनी याप्रकरणी कॉल गर्ल शिवानी, तिची मैत्रिण भारती आणि संदीप पाटील याला अटक केली आहे. तर तिचा प्रियकर देवा रॉय हा सध्या फरार आहे. पोलिस सध्या त्याचा शोध घेत आहे. सीसीटीव्ही फुटेजचे मदतीने पोलिसांना त्या तिघांना पकडण्यात यश आले आले.
दीपक कुऱ्हाडे हा बापगावच्या मल्हार चाळीमध्ये राहत होता. तो इथे इंटेरिअर डिझाईनचे काम करत होता. त्याचे लग्नही झाले होते. पण तो पत्नीपासून विभक्त झाला होता. तीन वर्षांपूर्वी तो महाविद्यालयात शिकणाऱ्या शिवानीला भेटला होता. तिथूनच त्यांची ओळख जास्त वाढत गेली होती. ती त्याच्या घरी सुद्धा जात होती.
काही दिवसांपासून मात्र शिवानीने दीपकच्या घरी जाणे बंद केले होते. २९ जून रोजी दीपकने शिवानीला पुन्हा त्याच्या घरी बोलवण्याचा प्रयत्न केला होता. पण तिने त्याच्या घरी येण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या दीपकने तिला शिवीगाळ केली होती. त्यामुळे तिला त्या शिवीगाळीचा बदला घ्यायचा होता.
शिवानीने आपला प्रियकर आणि मैत्रीण भारती आणि तिचा प्रियकर यांच्यासोबत मिळून दीपकची हत्या करण्याचा कट रचला. ३० जुनला दीपक नशेत असताना चौघांनी घरी येऊन दीपकची हत्या केली. तसेच त्याच्याकडे असलेली रोकड घेऊन पळ काढला.
त्यानंतर २ जूलैला दीपकच्या आईने दीपकला फोन केले पण तो उचलत नव्हता. त्यामुळे दीपकच्या पत्नीला त्याच्या घरी जाण्यास सांगितले. जेव्हा दीपकची पत्नी आणि मुलगी घरी आली तेव्हा दीपक मृत्यअवस्थेत घरी पडलेला होता. त्यानंतर लगेचच पोलिस ठाण्यात याप्रकरणी त्याच्या पत्नीने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिस तपासात हे सर्व उघडकीस आले आहे.