Baramati News : बारामतीमधून एक दुःखद घटना समोर आली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. बारामती शहरातील एका खासगी रुग्णालयातून मुलाला डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याला घरी घेऊन जात असताना वाहनाच्या धडकेत मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे.
तसेच या अपघातात आई गंभीर जखमी झाली आहे. हा अपघात बारामती येथील रिंगरोडवर झाल्याची माहिती आहे. तेजस विजय कासवे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. राधिका कासवे असे अपघातात जखमी झालेल्या तेजसच्या आईचे नाव आहे.
तेजस याच्यावर बारामतीमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला होता. तो रिंगरोडवरुन आपल्या आईसोबत दुचाकीवरुन घरी जात होता. परंतु याचवेळी त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगात आलेल्या एका हायवाने जोरात धडक दिली.
यामध्ये तेसज याचा खाली पडून जागीच मृत्यू झाला तर आई गंभीर जखमी झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.
या अपघातामुळे प्रशासनाने अशा अवजड आणि भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांवर अंकुश ठेवून कडक कारवाई करण्याची आवश्यकता असल्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.