Raj thackeray : गेल्या काही दिवसांपासून राज्यात टोलवरून आंदोलन पेटले आहे. यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टोल नाके जाळून टाकू असे म्हटले होते. यामुळे आता काही निर्णय घेण्यात आले आहेत. यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी मंत्री दादा भुसे आणि इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सरकारने टोलवरून जी आश्वासने दिली, त्याबाबत राज यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
सरकारने मला काही आश्वासने दिली असून ती पूर्ण करण्यासाठी १ महिन्याची मुदत मागितली आहे. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे २९ आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे १५ जुने टोल बंद करण्यासंदर्भात पुढील १५ दिवसांत मुख्यमंत्री निर्णय घेतील.
तसेच एंट्री पॉइंटवर पुढील १५ दिवस वाहने मोजण्यासाठी सरकारकडून कॅमेरे बसवण्यात येणार. सरकारसोबत मनसेही असे कॅमेरे लावणार. करारात नमूद केलेल्या सर्व सोईसुविधा, यामध्ये स्वच्छ स्वच्छतागृह, प्रथोमोपचारसाठी लागणारी सेवा, एक रुग्णवाहिका, प्रकाशयंत्रणा करावी लागणार.
मंत्रालयात एक यंत्रणा तयार केली जाईल. टोलनाक्यांवर काय समस्या जाणवत आहेत, त्या नोंदवण्यासाठी एक मोबाइल नंबर दिला जाईल. ठाण्यात जी टोल दरवाढ झाली आहे, ती रद्द करण्यासाठी सरकारने एक महिन्याचा अवधी मागितला आहे.
टोलनाक्यावर पूर्वी जी यलो लाइन होती, ती पुन्हा सुरू केली जाईल. या यलो लाइनच्या बाहेर रांग गेल्यानंतर रांग कमी होण्यापर्यंत सर्व गाड्या टोल न घेता सोडल्या जातील. टोलसाठी किती रुपयांचे टेंडर आहे, आतापर्यंत किती पैसे वसूल झाले आणि अजून किती पैसे जमा होणं बाकी आहे, हे दाखवणारा बोर्ड टोलनाक्यावर लावला जाईल.