वर्ध्यातील सेवाग्राममधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे आणि शेजारी कोणीही बोलत नसल्यामुळे एका कुटुंबाने घरातच मुलीचे अंत्यसंस्कार केल्याचे समोर आले आहे. ज्यामुळे संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
आर्थिक परिस्थिती बेताची होती. तसेच शेजारीही कोणी बोलत नव्हते. त्यामुळे अंत्यसंस्कार करायचे तरी कसे? असा प्रश्न मुलीच्या आईवडिलांना पडला होता. त्यामुळे त्यांनी घरातच मनोरुग्ण असलेल्या मुलीचे अंत्यसंस्कार केले आहे.
दहा दिवसांपर्यंत याबाबत पोलिसांना काहीच माहिती नव्हती. पण त्यानंतर कोणीतरी त्यांना याबाबत गुप्त माहिती दिली. त्यामुळे पोलिसांनी घरी येऊन याचा तपास केला. त्यानंतर मुलीचा पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे.
संबंधित घटना ही आदर्शनगरमधील आहे. प्रवीणा साहेबराव भस्मे असे त्या मृत मुलीचे नाव होते. तिचे वय ३७ होते. ती आपल्या आई, वडील आणि भाऊ-बहिणीसोबत राहत होती. ती मनोरुग्ण होती. त्यामुळे ती जास्त बाहेर येत नव्हती. पण ३ जूलैला तिची प्रकृती खुप खालावली होती.
त्याचदिवशी संध्याकाळी तिचा मृत्यू झाला. पण शेजारी कोणी बोलत नसल्यामुळे कुटुंबाने कोणालाही याबाबत माहिती दिली नाही. कोणाशीही नातं नसल्यामुळे त्यांनी कोणाला न सांगताच तिला घरातच पुरले. त्यांच्याकडे अंत्यसंस्कार करण्यासाठीही पैसे नव्हते.
तिच्या भावाने आणि वडिलांनी घरातील पहिल्या खोलीत पाच फुट खोल खड्डा खोदला होता. त्यामध्ये प्रवीणाचा मृतदेह पुरण्यात आला. त्यानंतर काहीही न घडल्याचे दाखवत ते रोजसारखी काम करु लागले. पण गुरुवारी पोलिसांना याबाबत माहिती मिळाली.
पोलिसांनी घरी येऊन तपास केला आहे. तसेच तिचा मृतदेह सुद्धा बाहेर काढण्यात आला आहे. याप्रकरणी तिचा भाऊ प्रशांतला ताब्यात घेण्यात आले आहे. एका वर्षापूर्वीच त्यांच्या एका मुलीचा मृत्यू झाला होता. तेव्हा शेजरच्यांनी मदत केली होती. पण यंदा त्यांनी शेजरच्यांकडे मदत का मागितली नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.