Mahabaleshwar News : सेल्फीने केला घात! नवविवाहीतेचा तोल गेला अन् थेट दरीतच कोसळली; महाबळेश्वरमधील भयंकर घटना

Mahabaleshwar News : महाबळेश्वरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पतीसोबत फिरायला आलेल्या पुण्यातील महिलेचा सेल्फी काढताना तोल जाऊन दरीत कोसळल्याने मृत्यू झाला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली. केट्स पॅाईंट परिसरात ही दुर्दैवी घटना घडली आहे.

येथील नीडल होल पॉईंट येथील धबधब्याचा फोटो व व्हिडीओ काढताना तोल जाऊन ही घटना घडली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. अंकिता सुनील शिरस्कर (गुरव) (वय २३, सध्या रा. धनकवडी, पुणे) असे त्यांचे नाव आहे.

सुनील ज्ञानदेव शिरस्कर (वय ३०, रा. उंबरेगव्हाण, ता.जि. धाराशिव. सध्या रा. धनकवडी, पुणे) हे पर्यटक दाम्पत्य दोन दिवसांसाठी महाबळेश्वरमध्ये पर्यटनास आले होते. त्यांनी येथील काही प्रेक्षणीय स्थळांना भेट दिली.

महाबळेश्वरपासून 6 किलोमीटर आले असता पतीकडे पत्नीने पुन्हा केट्स पॅाईंट पाहण्याची इच्छा व्यक्त केली. पतीने मात्र नकार दिला उशीर झाला असून लांब जायचे असल्याचे त्याने पत्नीला सांगितले. मात्र पत्नीने हट्ट केला. नंतर पती सुनीलचा नाईलाज झाल्याने हे दांपत्य दुपारी साडेचार वाजता केट्स पाँईट येथे गेले.

धबधबा पाहण्यासाठी सुरक्षा कठड्यावर बसून त्यांनी फोटो व व्हिडीओ काढले. यावेळी एक धबधब्याचा फोटो व व्हिडीओ घेताना अंकिता ही कठड्यावरून थेट तीनशे फूट दरीमध्ये कोसळली. यामुळे मोठा गोंधळ उडाला.

यामध्ये अपघातात ती जागीच ठार झाली. पत्नी कोसळताच पतीने आरडाओरडा सुरू केला. यावेळी याठिकाणी असलेले सर्व पर्यटक याठिकाणी धावत आले. स्थानिकांनी महाबळेश्वर व पाचगणी पोलीस ठाण्यासह वनविभाग, महाबळेश्वर ट्रेकर्स व सह्याद्री ट्रेकर्स यांना याबाबत माहिती दिली. 

यावेळी ट्रेकर्सचे जवानांनी तीन पथके तयार केली. दोनअडीच तासांच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह दरीतून वर काढण्यात यश आले. या घटनेने त्यांच्या कुटूंबाला मोठा धक्का बसला होता. दहा महिन्यांपूर्वीच त्यांचे लग्न झाले होते.