Samriddhi highway accident : मोठी बातमी! समृद्धी हायवेवर ट्रॅव्हल बसचा भीषण अपघात, १२ प्रवाशांचा जागीच मृत्यू, २३ गंभीर, बसचा चुराडा…

Samriddhi highway accident : समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. याठिकाणी वैजापूर जवळील समृद्धी महामार्गावरील जांबरगाव टोलनाक्यावर उभ्या ट्रकला ट्रॅव्हल्स बसने जोराची धडक दिली. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला आहे.

तसेच अपघातात २३ प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वैजापूर आणि छत्रपती संभाजीनगर घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. यातील काहीजण गंभीर जखमी झाले असल्याचे सांगितले जात आहे. हे सर्व प्रवासी नाशिक जिल्ह्यातील पाथर्डी आणि इंदिरानगर येथील रहिवासी आहेत.

हे भाविक बुलढाणायेथील सैलानी बाबाच्या दर्गा येथे दर्शनासाठी बस करून गेले होते. खाजगी बसमध्ये एकूण ३५ प्रवासी होते. असे असताना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग वैजापूर जांबरगाव शिवारात असलेल्या टोलनाक्यावर प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ट्रकला तपासणी करण्यासाठी थांबवले होते.

ट्रक चालक वाहन बाजूला घेत असताना पाठीमागून येणारी ट्रॅव्हल्स बस ट्रकवर आदळली. यामुळे हा भीषण अपघात झाला आहे. यामुळे मोठी पळापळ सुरू झाली. यानंतर यंत्रना कामाला लागली. पोलिस यंत्रणेला लगेच फोन गेले.

नंतर घटनास्थळावरून जखमी रुग्णांना तात्काळ स्थानिक रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या तपास सुरू असून जखमींवर उपचार सुरू करण्यात आले आहेत.