Kolhapur news : मुंबईहून त्याच्या मामाकडे आलेल्या मुलाचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. त्याला वाचवायला गेलेल्या मुलाचा देखील मृत्यू झाला आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. एक मुलगा नदीत बुडत असल्याचे पाहून दुसऱ्या मुलाने त्याला वाचवण्यासाठी मागचा पुढचा विचार न करता नदीत उडी मारली.
इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदीत ही घटना घडली आहे. नदीत बुडालेले दोघांचे मृतदेह तब्बल बारा तासांच्या शोध मोहिमेनंतर आपत्कालीन पथकाने शोधून काढले. मृतदेह आढळून आल्यानंतर कुटूंबाचे एकच आक्रोश केला.
तन्मय तुषार सपकाळ (वय १५, रा. मुंबई) सुट्टीसाठी त्याच्या मामाकडे आला होता. त्याचा मामा इचलकरंजीत राहतो. तो मित्रांसोबत पंचगंगा नदीमध्ये पोहण्यासाठी गेला होता. त्यावेळी ही धक्कादायक घटना घडली आहे.
तेथे एक १२ वर्षीय मुलगा नदीपात्रात बुडत असल्याचे पाहून तन्मय त्याला वाचविण्यासाठी गेला. मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने दोघेही वाहून गेले. त्यांना पाहून अन्य मित्रांनी आरडाओरड केली. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
आपत्कालीन विभागाने यांत्रिक बोट घेऊन शोधमोहीम राबवली. मात्र दोघेही सापडले नाहीत. अंधार पडल्यामुळे शोधमोहीम थांबवून सकाळी सहा वाजता पुन्हा सुरू करण्यात आली. शुक्रवारी दिवसभर तब्बल बारा तास पंचगंगा नदीत शोध घेतला आणि सकाळी १२ वर्षीय मुलाचा मृतदेह सापडला.
तसेच नंतर सायंकाळी ६ वाजता तन्मयचा मृतदेह सापडला. घटनेनंतर मात्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या नदीवर अशा प्रकारे अनेक घटना घडल्या आहेत. सध्या तपास सुरू केला आहे.