Lalit patil : गेल्या काही दिवसांपासून ससून रुग्णालयातून फरार असलेला ड्रग्स माफिया ललित पाटील याला रात्री चेन्नई येथून अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. यामुळे आता मोठी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. पोलीस याबाबत चौकशी करत आहेत.
यामध्ये आता काही नावे समोर येण्याची शक्यता आहे. ललित पाटील याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले असून त्यानंतर ललित पाटील याला अंधेरी न्यायालयात हजर केले जाईल. असे असताना आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पुणे पोलिसांबाबत काही प्रश्न उपस्थित केले.
जो पोलीस म्हणाला की, ललित पाटील माझ्या हाताला झटका देऊन पळाला, तोच पोलीस ललित पाटील याच्यासोबत लेमन ट्री हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत होता. त्यामुळे ललित पाटील याला ससूनमधून कोणी पळवून लावले, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.
यामध्ये फक्त ससून रुग्णालय प्रशासनच नव्हे तर काही बड्या राजकीय शक्तींचा हातही असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. हे प्रकरण हायप्रोफाईल असल्याने राज्यभरात या गुन्ह्याच्या तपासाची जोरदार चर्चा आहे. यामध्ये बडी नावे देखील समोर येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, रुग्णालयात जाण्यासाठी गाडीत बसताना ललितने प्रथम, ‘मी पत्रकारांशी बोलीन’, असे त्याने सांगितले. यानंतर पोलिसांच्या गाडीने वेग पकडल्याने त्याला फार बोलता आले नाही. यानंतर ललित पाटीलला रुग्णालयात आणल्यानंतर त्याने पुन्हा प्रसारमाध्यमांचे कॅमेरे दिसताच बोलायला सुरुवात केली.
मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवलं गेलं आहे. यामध्ये कोणाकोणाचा हात आहे, हे मी सगळं सांगेन, असे ललित पाटीलने म्हटले. यामुळे आता तो काय खुलासा करणार हे लवकरच समजेल. यामुळे मात्र राजकारणात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, ललित पाटील हा ससूनमधून पळाल्यानंतर नाशिक, गुजरात, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये गेला. नाशिकमध्ये जाऊन ललित पाटीलने बँकेतील आपली FD मोडली होती. त्या पैशातून ललितने एक किलो सोने विकत घेतले. ललित पाटीलसोबत दादा भुसे आणि शंभूराजे देसाई यांची देखील नार्को टेस्ट करा, असेही त्या म्हणाल्या.