Gadchiroli News : २० दिवसांत एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गडचिरोलीत घडली होती. पाच जणांच्या गूढ मृत्यूसत्राने गडचिरोलीमध्ये एकच खळबळ उडाली होती. यामध्ये चार आणि मावशी असे पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
या घटनेने अहेरी तालुका हादरला होता. याबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. याचा उलघडा करण्यात अखेर पोलिसांना यश आले असून सून आणि मामीला पाच जणांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सासरच्या छळाला कंटाळून सुनेने तर संपत्तीच्या वादातून मामीने मिळून हा कट रचला आहे.
आरोपी मामी रोजा रामटेके हिला चार एकरचा भूखंड हडपण्यासाठी कुटुंबातील १६ जणांचा जीव घ्यायचा होता. तसेच तिची भाचेसून संघमित्रा कुंभारे हिला वडिलांच्या आत्महत्येचा बदला घेण्यासाठी फक्त सासरे शंकर आणि सासूबाई विजया कुंभारे या दोघींनाच ठार मारायचे होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
असे असताना मात्र मामेसासूच्या जबरदस्तीमुळे तिने पतीसह आणखी तिघांचा जीव घेतला. दोघींनी अन्न आणि पाण्यातून विष देत हे हत्याकांड घडवून आणले. महागाव येथे २२ सप्टेंबरला रात्री जेवण केल्यानंतर विजया शंकर कुंभारे यांची तब्येत बिघडली. डोकेदुखी व थकवा जाणवू लागल्याने स्वत:च्या कारमधून पती शंकर तिरूजी कुंभारे यांनी त्यांना चंद्रपूरला नेले.
असे असताना नंतर त्यांनाही अस्वस्थ वाटू लागले, त्यामुळे तेही उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल झाले. नंतर त्यांची प्रकृती अधिक बिघडल्याने दोघांना नागपूरला आणले. पण उपचारादरम्यान शंकर तर २७ सप्टेंबर रोजी विजया यांचे निधन झाले.
नंतर विवाहित कन्या कोमल विनोद दहागावकर माहेरी होती. तिचीही प्रकृती खालावली. त्यांना अहेरी येथे ग्रामीण रुग्णालयात भरती केले. पण प्रकृती अधिक खालावल्याने चंद्रपूरला नेताना वाटेत त्यांचे निधन झाले.
दरम्यान, मुलगा आई – वडिलांच्या निधनानंतर गावी आल्यावर त्याचीही प्रकृती खालावली होती. त्याला नागपूरला खासगी दवाखान्यात हलविले होते. नंतर त्याचा देखील मृत्यू झाला. त्याची मावशी आनंदा उराडे या अंत्यविधीसाठी महागावला आल्या होत्या.
त्या देखील आजारी पडल्या. चंद्रपूर येथे खासगी दवाखान्यात उपचारादरम्यान त्यांचे देखील निधन झाले. हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यावरून पोलिसांनी तपास केला होता.