सध्या भारतात क्रिकेटचा विश्वचषक सुरू आहे. असे असताना यामध्ये अफगाणिस्तानची उत्कृष्ट कामगिरी कायम आहे. या संघाने प्रथम गतविजेत्या इंग्लंडला हरवून सर्वांना मोठा धक्का दिला. आता पाकिस्तानला पराभूत करून सर्वांना आश्चर्यचकित केले. या विजयानंतर अफगाणिस्तानचा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.
या सामन्यापूर्वी ती शेवटच्या म्हणजे दहाव्या स्थानावर होती. आता अफगाणिस्तानचे 5 सामन्यांतून 4 गुण झाले आहेत. अफगाणिस्तानने इंग्लंड आणि पाकिस्तानचा पराभव केला आहे. तर बांगलादेश, भारत आणि न्यूझीलंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे.
दरम्यान, पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी जल्लोष साजरा केला. याशिवाय अफगाणिस्तानच्या चाहत्यांनीही आनंदाने उड्या मारल्या. सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल होत आहेत.
या फोटोंमध्ये अफगाणिस्तानचे खेळाडू सेलिब्रेशन करताना दिसत आहेत. भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने राशिद खानसोबत साजरा केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानबद्दल बोलायचे झाले तर या संघाला सलग तिसऱ्या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, पाकिस्तानने आपल्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात शानदार शैलीत केली. या संघाने प्रथम नेदरलँडचा पराभव केला. यानंतर त्यांनी श्रीलंकेला पराभूत केले, परंतु त्यांची विजयी घोडदौड कायम ठेवता आली नाही.
भारताशिवाय ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानने पाकिस्तानचा पराभव केला आहे. आता पाकिस्तानचे 5 सामन्यांत 4 गुण झाले आहेत. पॉइंट टेबलमध्ये पाकिस्तान पाचव्या स्थानावर आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.