१९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने सर्व युवा खेळाडूंची निवड केली आहे. १५ सदस्यीय संघाचे कर्णधारपद ऋतुराज गायकवाडकडे असणार आहे.
बीसीसीआयने या स्पर्धेसाठी अनेक युवा खेळाडूंना संघात संधी दिली आहे. रिंकू सिंग, प्रभसिमरन सिंग आणि जितेश शर्मा या स्टार खेळाडूंनाही भारतीय संघात स्थान मिळाले आहे. या तिन्ही खेळाडूंनी आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी केली होती. त्यामुळे त्यांना भारतीय संघात स्थान दिल्याचे म्हटले जात आहे.
अशात अनुभवी फलंदाज शिखर धवनला मात्र संघात स्थान मिळालेले नाही. मीडिया रिपोर्टमध्ये असे म्हटले जात होते की धवन आशियाई क्रीडा स्पर्धेत संघाचे नेतृत्व करेल, परंतु त्याला संघात स्थान मिळू शकले नाही.
आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ मध्ये चीनमधील हांगझोऊ येथे २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहेत. एकदिवसीय विश्वचषकही त्याच काळात असल्याने बीसीसीआयने दुसऱ्या श्रेणीतील भारतीय संघाला आशियाई क्रिडा स्पर्धेत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
१९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पुरुष क्रिकेट संघ: ऋतुराज गायकवाड (कप्तान), यशस्वी जैस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेट किपर), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार , शिवम मावी, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंग (विकेट किपर). स्टँडबाय खेळाडू: यश ठाकूर, साई किशोर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, साई सुदर्शन.
दरम्यान, भारतीय संघाचे कर्णधारपद ऋतुराजला मिळाल्यामुळे त्याची लॉटरी लागल्याचे म्हटले जात आहे. ऋतुराज सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तो आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळतो. त्याने नुकतेच महाराष्ट्र प्रिमियर लीगमध्ये पुणेरी बाप्पाचे नेतृत्व केले होते.