Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकावर हल्ला करुन जेसीबी मशीन पेटवून देण्यात आला आहे. जिजाऊनगर मध्ये ही घटना घडली आहे. जमावाने सहाय्यक आयुक्तांसह कर्मचाऱ्यांना देखील मारहाण केली.
या भागात एका प्लॉटवरुन न्यायालयात वाद सुरु आहे. गोरख शिंदे, रामलाल शिंदे, मच्छींद्र शिंदे यांच्या वतीने बन्सीलाल देवमन कुचे यांनी महापालिकेत तक्रार अर्ज दिला होता. त्या भुखंडावर न्यायालयाने शिवाजी वाडकर यांच्या विरुध्द बेकायदेशीर बांधकाम करु नये असे आदेश दिले आहेत , असे असताना वाडकर आरसीसीचा पाया तयार करुन त्यावर पत्र्याचे शेड उभारीत आहेत.
कुचे यांचा अर्ज प्राप्त होताच सहाय्यक आयुक्त श्रीधर टापरे यांनी गुरुवारी सकाळी कारवाई केली. याठिकाणी जेसीबी मशीनच्या सहाय्याने त्यांनी त्या ठिकाणचे बांधकाम पाडून टाकले. यामुळे वाद वाढला. त्याठिकाणी अचानक जमाव आला आणि त्यातील लोकांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांवर हल्ला केला.
कारवाईसाठी आलेल्यांना मारहाण केली. त्यानंतर जमावाने जेसीबी मशीन पेटवून दिली, त्यानंतर जमाव निघून गेला. त्यानंतर अग्निशमन विभागाचे जवान घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी जेसीबीची आग आटोक्यात आणली. मात्र यामध्ये मोठे नुकसान झाले आहे.
यामध्ये पालिकेचे २५ ते ३० लाखांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणात पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. याबाबत पोलीस सध्या तपास करत आहेत. या घटनेमुळे मात्र शहरात याची चर्चा सुरू झाली आहे.