Akola News : हफ्ता मागणाऱ्या गुन्हेगाराला फळ विक्रेत्याने दिवसाढवळ्या संपवले, इतरांनी थेट पेढेच वाटले…

Akola News : अकोल्यात रस्त्यावरील भाजीपाला तसेच फ्रुट विक्रेत्यांकडून हफ्ता मागणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला चाकू भोकसून खून करण्यात आला आहे. मूर्तिजापूर शहरात भरवस्तीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत.

मृतकाच्या त्रासाला कंटाळून या फ्रूट विक्रेत्याने त्याला कायमचे संपवल्याचे बोलल्या जात आहे. परंतु देशमुख याची हत्या झाल्याची समजताच काहींनी पेढे वाटून आनंद लुटला. अनेकांना त्याचा त्रास असल्याचे सांगितले जात आहे. सुरेश महादेव देशमुख असे मृत व्यक्तीचे नाव आहे.  

दरम्यान, मृत व्यक्ती हत्येच्या गुह्यातून नुकताच तरूंगातून बाहेर आला होता. याप्रकरणी मूर्तिजापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारेकरी हा एक रस्त्यावरील फ्रूट विक्रेता आहे.

भगतसिंग चौकातील फळविक्रेत्यांसह भाजीपाला दुकान लावण्यावरून तसेच पैसे आणि फळांची मागणी करून सुरेश महादेव देशमुख हा त्रास द्यायचा. याठिकाणी तो अनेकांना त्रास देत होता. त्याच्या त्रासाला अनेक लोक त्रस्त झाले होते. 

याबाबत येथील अनेकांच्या तक्रारी होत्या. मुर्तीजापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक भाऊराव घुगे यांनी गेल्या आठ दिवसांपूर्वी त्याला समजावून सांगितले होते. मात्र त्याचा कारभार सुरूच होता. त्यांच्यात काही फरक पडला नाही.

दरम्यान, घटनेच्या दिवशी सुरेश देशमुख हा भगतसिंग चौकात आला. त्याने फळ विक्रेता अब्दुल खालीद अब्दुल मन्नान याला फळाची मागणी केली. त्याने फळ द्यायला नकार दिल्याने देशमुखने थेट त्याच्या अंगावर चाकू फेकून मारला. त्यानंतर देशमुख मारण्यासाठी त्याच्याकडे धावला, हे पाहताच फ्रुट विक्रेत्यांना त्याने फेकून मारलेला चाकू हातात घेऊन त्याच्यावर वार केले.