Kolhapur News: कोल्हापूर येथील घाटकरवाडी जंगलामध्ये आज एक धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली. याठिकाणी हत्ती हुसकावण्यासाठी गेलेल्या वन कर्मचारी, ग्रामस्थांच्या समूहावर हत्तीने प्रतीहल्ला केल्याने या हल्ल्यात वन कर्मचारी प्रकाश गोविंद पाटील हे ठार झाले आहेत.
याठिकाणी गेले आठ दिवस आजरा तालुक्यातील घाटकरवाडी परिसरात हत्ती धुमाकूळ घालत होता. यामुळे मोठे नुकसान होत होते. या हत्तीला हुसकावण्याची मोहीम आज वनविभाग आणि ग्रामस्थांनी हाती घेतली होती. यावेळी ही घटना घडली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
याठिकाणी सकाळी ९ वाजल्यापासून हत्तीला हुसकवण्यासाठी वन विभागातील कर्मचारी प्रयत्न करत होते. यावेळी झाडीतून हत्ती बाहेर आला आणि हुसकावण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थ व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर हत्तीने हल्ला केला.
यामुळे मोठी पळापळ झाली. यावेळी वनकर्मचारी प्रकाश गोविंद पाटील यांना हत्तीने सोंडेत पडकून फिरवून जमिनीवर आपटले. यावेळी पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. हत्ती पुन्हा झुडपात गेल्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रकाश पाटील यांच्याजवळ गेले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले.
दरम्यान, याठिकाणी गेली १० वर्ष हत्तीचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत होती. यामुळे ही मोहीम हाती घेण्यात आली होती. मात्र याला गालबोट लागले असून कर्मचाऱ्याचे निधन झाले आहे.
वन विभागाच्या कर्मचाऱ्यालाच मृत्यूला सामोरे जावे लागल्याने आता तरी हत्तीचा बंदोबस्त होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे.