Nanded ACB Action : निवृत्ती जवळ आलेली पण साहेब लाखोंमध्ये खेळत होते, घरी ७२ लाखांची रोकड अन्…

Nanded ACB Action : नांदेडमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्याला निविदा मंजूर करण्यासाठी ६ लाख ४० हजार रुपयाची लाच घेतल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तपास सुरू आहे.

यासोबतच अन्य एका वरिष्ठ लिपिकाला देखील ताब्यात घेतले आहे. सेवा निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या या अधिकाऱ्याने हा कारभार केला आहे. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. लाच लुचपत विभागाने ही कारवाई केली आहे.

मुख्य अभियंत्याच्या घराची झडती घेतल्यानंतर ७२ लाख ९१ हजार रुपये रोकड सापडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली. येथील एका कंत्राटदाराला केदारगुडा, पिंगळी, डोंगरगाव, हदगाव, गोरलेगाव, गुरफळी या रस्त्याच्या कामाचे टेंडर मिळाले होते. हे काम १४ कोटी १० लाख रुपयाचे आहे.

याची निविदा मंजूर करण्यासाठी अधीक्षक अभियंता गजेंद्र राजपूत यांनी ७ लाख रुपयाची लाच मागितली होती. तसेच, येथील वरिष्ठ लिपिक विनोद कंधारे यांनी देखील शिफारसीसाठी ५० हजाराची मागणी केली होती.

या प्रकरणी तोडजोडीनंतर ६ लाख ४० हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर कंत्राटदाराने लाच लुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. यामुळे ही घटना उघडकीस आली आहे. लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी कार्यालयात सापळा रचला. 

यावेळी लाच स्वीकारताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. अधिकाऱ्यांनी अधीक्षक अभियंता गजेंद्र राजपूत यांच्या कार्यालयासह घराची झडती घेतली. या झडती दरम्यान दोन डीवायएसपी, चार पोलिस निरीक्षकासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

त्यांच्या कपाटात आणि गादीखाली ५०० रुपयाचे बंडल आढळून आले. यावेळी ७१ लाख ९१ हजार ४९० रुपयाचे रोकड आढळून आले. हे पैसे मोजण्यासाठी मशीनचा वापर करण्यात आला. रात्री उशिरपर्यंत ही कारवाई सुरूच होती.