Sambhajinagar News: आई- वडिलांनी नवजात अर्भकाला पोत्यात भरून उसाच्या शेतात सोडलं, निर्दयी कृत्याने संभाजीनगर हादरलं…

Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. शहराजवळील एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकलेहरा यथील उसाच्या शेतात नवजात पुरूष जातीचे अर्भक जखमी अवस्थेत शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांना आढळून आले.

एकलेहारा येथील अनिल शिंदे यांच्या शेतामध्ये नवजात अर्भक रडत असल्याचा आवाज शेजारील शेतात काम करणाऱ्यांना आला. सिमेंटच्या टाकाऊ गोणीच्या पोत्यावर नुकतेच जन्मलेले अर्भक त्यांना दिसले.  याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली.

दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अर्भकाला पोलीस व्हॅनमध्ये बजाजनगर येथील रुग्णालयात दाखल केले. नुकतेच जन्माला आलेले अर्भक पोलिसांनी ताब्यात घेतले, तेव्हापासून भुकेमुळे रडत होते.

दरम्यान, बाळाच्या शरीरावर किरकोळ जखमा असल्याचे आढळून आले. डॉक्टरांच्या सांगण्यावरून फौजदार शिंदे यांनी बाळासाठी दोन जोडे ड्रेस, पांघरून, दूध आणि औषधी खरेदी केली. यावेळी वर्दीतील माणुसकी दिसून आली.

पोलिसांना ज्या ठिकाणी बाळ आढळून आले, त्या ठिकाणापासून जवळच नांदेडा येकलहरा मार्गावर रस्त्यात रक्त सांडल्याचे आढळून आले. त्यावरूनच पोलिसांनी सदरील माता या ठिकाणी प्रसूत झाली असावी, असा अंदाज वर्तविला. त्यानुसार तपास केला.

तुर्तास सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर गुन्हा दाखल करुन आर्भकाला टाकून देणाऱ्या निर्दयी आई-वडिलांचा शोध घेतला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे.